Purandar Road Safety Pudhari
पुणे

Purandar Road Safety: सायकल ट्रॅकमुळे रस्ते सुधारले; पण पुरंदरमध्ये वाढला अपघातांचा धोका

स्पीडब्रेकर हटवल्याने नागरिक धास्तावले; शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

सासवड: आंतरराष्ट्रीय सायकल ट्रॅकच्या अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील अनेक रस्त्यांचा कायापालट करण्यात आला आहे. मात्र, याच कामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चांबळी-कोडीत-नारायणपूर हा महत्त्वाचा मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देत असल्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

सायकल ट्रॅकच्या कामादरम्यान अपघात टाळण्यासाठी या मार्गावर स्पीडबेकर बसविण्यात आले होते. मात्र, रस्त्याचे डांबरीकरण व इतर कामे करताना सर्व स्पीडबेकर काढून टाकण्यात आले. परिणामी, वाहनचालक सुसाट वेगाने गाड्या चालवत असून, अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

हा मार्ग तीर्थक्षेत्राशी जोडलेला असल्याने दररोज हजारो भाविक या रस्त्याचा वापर करतात. त्याचबरोबर या मार्गावर जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि इतर शैक्षणिक संस्था असल्याने शाळकरी मुलांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

दरम्यान, शुक्रवारी (दि. 17) म्हस्कोबावाडी जिल्हा परिषद शाळेतील दुसरीत शिकणारी रिद्धी अमोल बडदे ही विद्यार्थिनी अपघातातून थोडक्यात बचावली. भरधाव आलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी तिच्या अंगावर येण्याची वेळ आली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र मुलीच्या हाताला दुखापत झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती विकास शिवाजी बडदे व शंकर हरीभाऊ बडदे यांनी दिली.

रस्ते चांगले होणे आवश्यक असले, तरी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार असेल, तर त्या विकासाचा काय उपयोग? असा सवाल स्थानिक ग््राामस्थ उपस्थित करीत आहेत. विशेषतः शाळकरी मुले, वृद्ध आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या मार्गावरील अपघातांची शक्यता लक्षात घेता महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड बेकर बसविणे, वाहतूक नियंत्रणासाठी सूचना फलक लावणे आणि नियमित गस्त वाढविणे यांसारख्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT