Purandar Farmer Crisis Pudhari
पुणे

Purandar Farmer Crisis: ढगाळ वातावरणामुळे मक्यावर अळी; औषध फवारणीचा खर्च वाढला

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: यावर्षी अल्प पाऊस झाल्याने पुरंदर तालुक्यातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच ढगाळ वातावरण व बदलत्या हवामानामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.

जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याकरिता लागवड केलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

अल्प पावसामुळे जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट झाली असून, जनावरांना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

अशा परिस्थितीत अल्प पाण्यावर मका पीक जगविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे. बदलत्या वातावरणाचा शेतीवर आणि पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

वाल्हे आणि परिसरातील शेतकरी पीक वाचविण्यासाठी औषध फवारणी करीत आहेत. दुधाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यात मका पीक वाचविण्यासाठी औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने त्यांच्यावरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT