सासवड: पावसाळ्याचा एक महिना संपत आला तरी पुरंदर तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. पिण्याच्या पाण्यासह शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील प्रमुख सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गराडे धरणासह इतर जलसाठ्यांतील पाणीसाठा तळाला गेला आहे. त्यामुळे तालुक्यावरील दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
गराडे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी तालुक्यातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असून, अनेक जलस्रोत कोरडेठाक पडल्याचे सांगितले. त्यामुळे सासवड शहरासह ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठा योजनांवरही संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने प्रशासनालाही टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. तालुक्यातील २४ गावठाणे आणि विविध वाड्या-वस्त्यांमध्ये सध्या ३२ शासकीय टँकरद्वारे दररोज ८५ खेपा करून नागरिकांसह जनावरांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऐन पावसाळ्यात टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने ग्रामीण भागातील परिस्थितीची गंभीर होत चालली आहे.
जून महिना संपत आला तरी तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी विहिरी, ओढे, नाले आणि लहान जलस्रोतांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत आहे. शेतीसाठीही पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस आणखी लांबल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतीपूरक उद्योगधंदे, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थचक्रावरही विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. दुसरीकडे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच हिरव्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट होत आहे. अनेक ठिकाणी चारा छावण्या किंवा चारा डेपो तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे. यंदा पाऊस कमी झाल्यास तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन, जलसंधारण उपाययोजना आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.