

सुरेश मोरे
वानवडी: पीएमपीच्या काही पास केंद्रांच्या वेळेत केलेल्या बदलामुळे विद्यार्थी, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणारी बहुतांश पास केंद्रे आता सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहत असल्याने पास काढण्यासाठी येणारे विद्यार्थी आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे पास केंद्र सुरू ठेवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी पीएमपी ही दैनंदिन प्रवासाची प्रमुख जीवनवाहिनी आहे. वाढती महागाई आणि खासगी वाहनांचा वाढलेला खर्च लक्षात घेता नागरिक मोठ्या प्रमाणावर पीएमपी बससेवेचा वापर करतात. अनेक प्रवासी सकाळी लवकर पास काढून कामानिमित्त विविध भागांत जात असतात. मात्र, वेळेत झालेल्या बदलामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या हडपसर, कात्रज, स्वारगेट, डेक्कन, रेल्वे स्टेशन, निगडी आणि भोसरी ही केवळ सात पास केंद्र पूर्वीच्या विस्तारित वेळेनुसार सुरू आहेत. उर्वरित पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे २५ ते ३० पास केंद्र सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेतच सुरू राहत आहेत. या बदलाचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळा-कॉलेजच्या वेळेतच पास केंद्र सुरू राहत असल्याने विद्यार्थ्यांना वर्ग बुडवून पास काढावा लागतो किंवा पालकांना रजा घेऊन मुलांसोबत पास केंद्रात जावे लागत आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार प्रवाशांनाही या वेळापत्रकामुळे अडचणी येत आहेत. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे वेळेत बदल करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी आवश्यक असल्यास इतर विभागांतील कर्मचारी पास विभागात नियुक्त करून पूर्वीचे वेळापत्रक कायम ठेवावे, अशी मागणी प्रवासी आणि जाणकार नागरिकांकडून होत आहे.
मनुष्यबळ कमी असल्यामुळे बहुतांश पास केंद्रांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ करण्यात आली आहे. मात्र, सात प्रमुख पास केंद्र पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहण्याची गरज पडू नये म्हणून आमची टीम शाळांमध्ये जाऊन पासचे वितरण करणार आहे. प्रमुख सात केंद्रांना आठवड्याची सुट्टी नाही, तर इतर केंद्रांना रविवारी सुट्टी राहील.
गणेश शिंदे, पास विभागप्रमुख, पीएमपी