जेजुरी: पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक १८ मे रोजी मांडकी ता.पुरंदर येथे छापा टाकून सुमारे २८ लाख रूपयांचा चंदनसाठा जप्त केलेला आहे.
पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांचे आदेशा नुसार दहशतवाद विरोधी शाखेचे पथकाने जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत वेशांतर करून संशयित आरोपीचा शोध घेताना वाल्हे येथे सदर पथकास एका खबऱ्यामार्फत, मांडकी, पाटील वस्ती ता.पुरंदर जि.पुणे येथे विलास भोसले यांचे शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदनाचा साठा लपवून ठेवला असल्याची बातमी मिळाली होती.
त्यानुसार जेजुरी पोलीस स्टेशन मधील कर्मचारी मदतीसाठी घेऊन मांडकी येथे विलास रावजी भोसले यांचे शेतात जावून शोध घेतला असता तेथे हिरवे कापडाच्या खाली लपवून ठेवलेले ५६० किलो वजनाचे चंदनाचे कापून ठेवलेले लाकडी ओंडके तसेच एक झाडे कापण्याचा बॅटरीवर चालणारा कटर कटर व दोन लोखंडी ड्रील असा एकूण किंमत रुपये २८,०५,२००/- (अठ्ठावीस लाख पाच हजार दोनशे) चा माल मिळून आला. या ठिकाणी अनधिकृतपणे चोरून आणलेला व विक्रीचे उद्देशाने ठेवलेला चंदनाचा साठा पोलिसांनी जप्त करण्यात आला.
शेतीमालक विलास रावजी भोसले यांच्याकडे चौकशी केली सदरचे चंदन हे त्यांचा भाचा प्रतिक प्रमोद खुंटे रा.मांडकी, पाटीलवस्ती ता. पुरंदर जि.पुणे याने ठेवले असल्याचे सांगितले. त्याचा शोध घेतला असता तो पोलिसांना मिळून आला नाही. याबाबत निष्पन्न आरोपी प्रतिक प्रमोद खुंटे याचेवर जेजुरी पोलीस स्टेशनला बी.एन.एस. कलम ३०३(२), भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम २६, ४१, ४२ सह महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९८८ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. गुन्ह्यातील आरोपी प्रतिक खुंटे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सातारा जिल्ह्यात जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल व बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रविंद्र जाधव, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक व जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांचे पथकाने केलेली आहे.