सासवड: पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील जमीन व्यवहारात भागीदारीच्या नावाखाली विश्वास संपादन करून तब्बल ४३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ॲड. ज्ञानेश्वर सीताराम कराळे (रा. देहूगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनिष दिलीप भागणे (रा. ४६२, तिसरा मजला, रामसुख विद्युत, पासोड्या विठोबा मंदिराजवळ, बुधवार पेठ पुणे), सागर नामदेवराव गरूड (रा. यशोदीप हौसिंग सोसायटी वारजे माळवाडी पुणे), अरुण हरिभाऊ मांजरे (रा. खेड शिवापूर, ता. भोर), अमोल शिंदे (रा. पुणे), नीलेश ज्ञानेश्वर गांगर्डे (रा. पिंपळे गुरव, पुणे) यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, सागर गरूड याच्या माध्यमातून मनीष भागणे याची ओळख झाली होती. जमीन खरेदी-विक्री व्यवसायात भागीदारी करण्याच्या प्रस्तावावर विश्वास ठेवून कराळे यांनी जुलै २०२० मध्ये 'गजराज डेव्हलपर्स' या नावाने भागीदारी संस्था स्थापन केली. व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण भांडवल स्वतः गुंतविण्याचे ठरले होते. त्यानंतर भिवडी (ता. पुरंदर) येथील गट क्रमांक ३८८ मधील ८० आर क्षेत्र खरेदी करण्यासाठी कराळे यांनी विविध टप्प्यांत धनादेश व रोख स्वरूपात एकूण ४३ लाख रुपये मनीष भागणे याच्याकडे दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या रकमेतून संबंधित जमीन व्यवहार पूर्ण करण्यात आला.
दरम्यान, भागीदारी करारातील अटींचे उल्लंघन करून आणि फिर्यादीची कोणतीही संमती न घेता संबंधित जमिनीवर इतरांच्या नावाने अधिकारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) तयार करण्यात आले. त्यानंतर जमिनीतील काही हिस्सा तृतीय पक्षांना विकून त्यातून मिळालेली रक्कम परस्पर वाटून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
याशिवाय, आर्थिक देणी परत करण्यासाठी एप्रिल २०२४ मध्ये ३५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला; मात्र, संबंधित धनादेश ज्या खात्याचा होता ते खाते अनेक वर्षांपूर्वीच बंद असल्याचे बँकेच्या तपासणीत समोर आल्याने तो धनादेश अवैध ठरला. त्यामुळे फसवणुकीचा हेतू असल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली, विश्वासघात केला आणि जमीन व्यवहारातून आर्थिक फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.