सासवड: पुरंदर तालुक्यात खासगी सावकारीचे जाळे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. १० ते ३० टक्क्यांपर्यंत अवाजवी व्याजदर आकारून गरजूंची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याने अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.
सासवड शहरासह ग्रामीण भागातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची चर्चा असून, या प्रकारामुळे सामाजिक आणि आर्थिक असंतोष वाढत आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्री व्यवहारांमधून काही व्यक्ती अल्पावधीत कोट्यधीश झाल्या. या व्यवहारांमध्ये बोगस खरेदी-विक्री, बनावट दस्तऐवज आणि संशयास्पद आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढल्याची चर्चा आहे. याच पैशातून अनेकांनी खासगी सावकारीचा व्यवसाय सुरू केल्याचे बोलले जात असून, गरजू नागरिकांना सहज कर्ज देण्याच्या नावाखाली त्यांना आयुष्यभराच्या कर्जाच्या विळख्यात अडकवले जात आहे.
कर्ज देताना कोरे धनादेश, घरांच्या मालकीची कागदपत्रे, शेतीचे दस्तऐवज किंवा स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेण्याची पद्धत अनेक ठिकाणी रूढ झाली आहे. सुरुवातीला कमी रकमेचे कर्ज देऊन नंतर व्याजावर व्याज आकारले जात असल्याने मूळ रक्कम फेडणे अशक्य होते. परिणामी अनेकांची घरे, शेती आणि मालमत्ता सावकारांच्या ताब्यात गेल्याच्या घटना समोर येत आहेत.
सावकारांकडून आर्थिकच नव्हे तर मानसिक दबावही टाकला जात असल्याच्या तक्रारी आहेत. वसुलीसाठी धमक्या, अपमान, सामाजिक बदनामी आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून कर्जदारांना गप्प बसवले जात असल्याचे सांगितले जाते. काही कुटुंबांनी गाव सोडून पलायन केल्याच्या घटनाही घडल्या असून, अनेक प्रकरणे भीतीपोटी पोलिसांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
पुरंदर तालुक्यात वाढत चाललेल्या खासगी सावकारीमुळे आर्थिक विषमता आणि सामाजिक असुरक्षितता अधिक तीव्र होत आहे. अवाजवी व्याजदर, बोगस व्यवहार, बेकायदेशीर वसुली आणि मालमत्ता बळकावण्याच्या घटनांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी पोलिस, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने कठोर कारवाई करणे, ही काळाची गरज बनली आहे. यासह नागरिकांनीही भीती न बाळगता पुढे येऊन तक्रारी नोंदवल्यास या बेकायदेशीर सावकारीच्या साखळीला मोठा आळा बसू शकतो.
भीती न बाळगता माहिती द्या: पोलिस निरीक्षक घोळवे
सासवड शहर आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर सावकारी तसेच दमदाटी करून वसुली करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तालुक्यातील अशा प्रवृत्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, नागरिकांनी धाडसाने पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सावकारांवर कठोर कारवाई करणार: आ. शिवतारे
खासगी सावकारीने पुरंदर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. आमदार झाल्यापासून या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेकायदेशीर व्याजाचा व्यवसाय करणारे कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाहीत. बाधितांनी सासवड किंवा जेजुरी पोलिस ठाण्यात तसेच माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तक्रारींची गंभीर दखल घेऊन पिळवणूक थांबविण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले.