पुणे

पुरंदरला खरिपाचा पेरा घटला; पेरणीयोग्य पाऊस नसल्याचा परिणाम

अमृता चौगुले

बेलसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटल्यानंतरदेखील पुरंदर तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामात होणार्‍या पेरण्या अद्याप रखडल्या आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मूग, उडीद व इतर तृणधान्ये, कडधान्ये, गळीत धान्ये घेतली जातात; परंतु यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अक्षरशः काही एकर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.

खरीप हंगामामध्ये यंदा 25 टक्के एकूण पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सन 2022 व 2023 मध्ये झालेल्या पेरणीत अत्यंत तफावत जाणवत आहे. एकूण अन्नधान्य पेरणी सरासरी क्षेत्र 1 हजार 550 हेक्टर असून, त्यातील चालू वर्षे फक्त 269.50 हेक्टर म्हणजेच केवळ 1.80 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

खरीप हंगामामध्ये यंदाच्या वर्षी पेरणी कमी झाल्यामुळे त्याचा उत्पन्नावरही मोठा परिणाम होणार आहे व उत्पन्न कमी होऊन खरिपातील पिकांना जास्त बाजारभाव मिळण्याची चिन्हे वर्तविण्यात येत आहेत. शेती करण्यासाठी पाणीच नसल्यामुळे शेतकरी आता संभ—मावस्थेत आहे. कृषी मालाला मिळत असलेला अधिकचा बाजारभाव व एका बाजूला कमी पर्जन्यमान यामुळे शेतकर्‍याची चिंता अधिक वाढली आहे.

निविष्ठा खरेदीकडे शेतकर्‍यांची पाठ

यंदा खत निविष्ठा केंद्रांमध्ये म्हणजेच कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी कमी असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यात कृषी निविष्ठा खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती; परंतु चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकर्‍यांचे व शेतीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांचे अर्थचक्र विस्कळीत झालेले दिसून येत आहे.

पुरंदर तालुक्यात जून महिन्यात सरासरी पाऊस 112 मिलिमीटर पडतो. परंतु चालू वर्षी एकूण 47 मिलीमीटर पावसाची नोंद जूनअखेर झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या 42 टक्के असून, तूर्तास जवळपास 25 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, प्रामुख्याने बाजरी व वाटाणा पिकाची पेरणी झालेली आहे. जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. चांगला पाऊस झाल्यास पेरणी क्षेत्रात वाढ होईल.

– सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT