परिंचे: वीर (ता. पुरंदर) येथील धरणसाखळीत समाविष्ट असलेल्या भाटघर, निरा-देवधर, गुंजवणी आणि वीर या चार धरणांमध्ये सध्या केवळ ६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकूण ४८ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणसाखळीत अवघा १० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने सिंचनासाठीचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला असून, पिण्यासाठी राखीव साठा ठेवण्यात आला आहे.
यंदा उन्हाळी पावसाने धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. त्यातच कडक उन्हाळा आणि वाढलेल्या तापमानामुळे धरणांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी आता मोसमी पावसाकडे आशेने नजर लावली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या भागात अधूनमधून उन्हाळी पाऊस होत असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली होती. त्यामुळे पाणी विसर्गावर सकारात्मक परिणाम झाला होता. यंदा मात्र उन्हाळी पाऊस अत्यल्प झाल्याने सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
१२ जूनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपलब्ध होत होते. मात्र, १३ जूनपासून सर्व धरणांतून सिंचनासाठीचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
निरा नदी खोऱ्यातील या धरणांवरील पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी तरकारी पिके तसेच फळबागा विकसित केल्या आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे ही पिके आणि फळबागा उन्हाच्या तडाख्याने करपू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गुरुवार (दि. १७) रोजी चारही धरणांमध्ये मिळून केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद झाली.
मागील वर्षी याच दिवशी या धरणसाखळीत १० टीएमसी म्हणजेच १९.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. सध्याच्या पर्जन्यमानाचा विचार करून सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असून, पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वीर धरण प्रशासनाचे कर्मचारी संभाजी शेडगे यांनी दिली.
उन्हाच्या तडाख्याने करपू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गुरुवार (दि. १७) रोजी चारही धरणांमध्ये मिळून केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद झाली. मागील वर्षी याच दिवशी या धरणसाखळीत १० टीएमसी म्हणजेच १९.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. सध्याच्या पर्जन्यमानाचा विचार करून सिंचनासाठीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असून, पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वीर धरण प्रशासनाचे कर्मचारी संभाजी शेडगे यांनी दिली.
वीर धरणातून सध्या निरा डावा कालवा आणि निरा उजवा कालवा बंद ठेवण्यात आला आहे. चारही धरणांतील पाणीपातळीत मोठी घट झाल्याने सिंचनासाठीचा पाणीपुरवठा थांबवून पिण्यासाठी राखीव साठा ठेवण्यात आला आहे.- स्वरूपा माळी, अभियंता, वीर धरण