पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी 72 टक्क्यांहून अधिक जमिनीची संमतीपत्रे सात गावांतील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जमिनीच्या मोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. (Pune latets News)
पुरंदर येथील सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून त्यासाठी एकूण तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी संमतीपत्रे घेण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. संमतीपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर आहे. संमतीने जागा देणार्या मालकांना दहा टक्के विकसित भूखंडाचा परतावा मिळणार आहे, तर संमती न देणार्यांना हा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत 2,180 एकराहून अधिक जमिनीची संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाली आहेत.
भूसंपादन करण्यात येणार्या एकूण जमिनीपैकी जवळपास 70 टक्क्यांहून अधिक जमिनीची संमती मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील पाऊल उचलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, “संमतीपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत 18 सप्टेंबर आहे. या मुदतीत जमिनीचे मालकांनी संमतीपत्रे सादर करून दहा टक्के विकसित भूखंडाचा मोबदला घ्यावा. ही मुदत संपल्यानंतर आठ दिवसांनी विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणार्या जमिनींच्या मोजणीस सुरुवात करण्यात येणार आहे.” दरम्यान, आज जिल्हाधिकार्यांनी विमानतळासाठी संपादित होणार्या सातही गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.