पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा अहवाल शासनाकडे — जिल्हाधिकाऱ्यांची माहितीनारा Pudhari
पुणे

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा अहवाल शासनाकडे — जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सात गावांतील ३ हजार एकर जमिनीचा तपशील असलेला अहवाल राज्य सरकारकडे; शेतकऱ्यांच्या मोबदल्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 3 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल मंगळवारी (दि. 11) राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालाला मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासन जमिनीच्या मोबदल्याची रक्कम निश्चित करून तिच्या वाटपाचे वेळापत्रक ठरवणार आहे.(Latest Pune News)

विमानतळासाठी सात गावांतील सुमारे 1 हजार 285 हेक्टर (सुमारे तीन हजार एकर) जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यापैकी पारगाव येथील 3 ते 4 टक्के जमीन ताब्यात आली नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

संमती मिळालेल्या जमिनीच्या मोजणीचे काम आता पूर्ण झाले असून, अहवाल तयार करण्यास निर्धारित वेळेपेक्षा सुमारे आठवडा अधिक लागला आहे. या अहवालावरच प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा तसेच शेतातील झाडे, विहिरी, पाइपलाइन यांचा मोबदला ठरवला जाणार आहे. त्यामुळे अहवाल तयार करताना विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यानुसार आता हा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कायद्यातील कलम 32 (1) नुसार राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे, असे डुडी यांनी सांगितले.

याप्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पुढील दोन आठवड्यांत कलम 32 (3) नुसार शेतकऱ्यांचा मोबदला तयार करण्याचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, जमिनीचा मोबदला आणि परतावा वाढवून मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, त्याबाबत राज्य सरकारशी चर्चा करू, असेही डुडी यांनी स्पष्ट केले. ‌’32(1)‌’ चा प्रस्तावामध्ये संपादनासाठी आवश्यक सर्व माहिती व कागदपत्रे नमूद केलेली असतात. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि त्यानंतर मोबदला निश्चित करण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. राज्य सरकारकडून प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर मोबदला निश्चित केला जातो. त्यानंतर भूसंपादन आणि मोबदला वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT