जितेंद्र डुडी
पुणे : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सात गावांमधील जमिनीची किरकोळ गट वगळता संपूर्ण मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता भूमिअधिग्रहणाबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. या अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबतचा अहवाल तयार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(Latest Pune News)
पुरंदर विमानतळासाठी कुंभारवळण, वनपुरी, खानवडी, उदाचीवाडी, मुंजवडी, एखतपूर आणि पारगाव अशा सात गावांधून 1 हजार 285 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी 26 सप्टेंबरपासून सात गावांमधून मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने पाच पथके तयार केली होती. त्या पथकामार्फत ही मोजणी पूर्ण करण्यात आली. त्याकरिता भूसंपादन अधिकारी समन्वयक डॉ. कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तसेच भूसंपादन अधिकारी डॉ. संगीता चौगुले-राजापूरकर या तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पारगाव वगळता उर्वरित गावांमध्ये मोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. मात्र, पारगाव गावात काही शेतकऱ्यांनी मोजणी करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा गट वगळता जिल्हा प्रशासनाने संपूर्ण मोजणी गेल्या शनिवारी पूर्ण केली.
काही किरकोळ शेतकऱ्यांकडून विरोध होत असला, तरी हा विरोध तात्कालिक असून, त्यांच्याकडून संमती घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी, विरोधाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने ड्रोन सर्व्हेद्वारे संपूर्ण सातही गावांतील 1 हजार 285 हेक्टरची मोजणी दोन दिवसांपूर्वीच पूर्ण केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असला तरी मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. येत्या काही दिवसांत त्या शेतकऱ्यांचे मन वळविण्याचे आणि संमती घेण्याचे कामही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सात गावांतील 3 हजार 200 शेतकऱ्यांनी 2810 एकर जागेसाठी संमती दिली आहे. आता शेतकऱ्यांशी चर्चा करून जागेच्या मोबदल्याचे स्वरूप निश्चित करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.