Purandar Airport | पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना एकरी एक कोटी रुपयांपर्यंत भरपाईचा प्रस्ताव File Photo
पुणे

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना एकरी एक कोटी रुपयांपर्यंत भरपाईचा प्रस्ताव

सात गावांतील शेतकऱ्यांसोबत बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींची माहिती; विकसित भूखंड, स्थलांतर अनुदान आणि प्रशिक्षण सुविधांचाही समावेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुरंदर विमानतळासाठी संपादित जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना प्रतिएकरी एक कोटी रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा प्रस्ताव असून, घरासह गोठा, विहीर, बोअरवेल, पाइपलाइन तसेच फळझाडे व वनझाडे यांसारख्या घटकांसाठी त्यांच्या मूल्याच्या दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले..(Latest Pune News)

भूसंपादन झालेल्या सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी ही माहिती दिली. ही बैठक एखतपूर, खानवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पारगाव, उदाचीवाडी व वनपुरी या सात गावांतील शेतकऱ्यांसमवेत घेण्यात आली.

डुडी म्हणाले, “शासनाने 17 मार्चला दिलेल्या अधिसूचनेनुसार योग्य भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण या दृष्टीने 2013 च्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियमाच्या तरतुदींनुसार तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासकीय नियमांनुसार मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील. नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.”

बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी केल्या या मागण्या...

चारपट ऐवजी पाचपट दर मिळावा. जिल्हा नियोजन निधीतून गावांना अधिक निधी द्यावा. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा गावागावांत बैठक घ्याव्यात. बाजार भावानुसार एक कोटींचा दर अपुरा असल्याने अधिक भरपाई मिळावी. विकसित भूखंड मालकी हक्काने द्यावेत. प्रती एकरी जादा मोबदला आणि जादा विकसित भूखंड मिळावा.

सर्व मागण्यांवर जिल्हाधिकारी म्हणाले...

संपादित जमिनीच्या क्षेत्राच्या 10 टक्के एवढा विकसित भूखंड औद्योगिक, वाणिज्यक, निवासी अथवा संमिश्र प्रयोजनाकरिता त्याच क्षेत्रात वाटप करण्यात येईल. (किमान 100 चौरस मीटर भूखंडाची हमी) प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे घर संपादन झाले असल्यास, ‌‘एरोसिटी‌’मध्ये 250 चौरस मीटर निवासी भूखंड मोबदला दराने दिला जाईल.

भूमिहीन होणाऱ्या प्रकल्पग्रास्तांना 750 दिवसांच्या किमान कृषी मंजुरी इतकी रोख रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल. अल्पभूधारक ठरणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 500 दिवसांच्या कृषी मजुरीएवढी रक्कम मिळेल. घर संपादन झालेल्या कुटुंबांना 40 हजार रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल. जनावरांच्या गोठा, शेड स्थलांतरासाठी प्रती गोठा 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका सदस्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल व पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्य दिले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT