पुणे: ‘स्त्रीसन्मान आणि स्त्रीसुरक्षा’ या विषयाचे महत्त्व जाणून स्त्रियांचे सक्षमीकरण, समानता, यासाठी वर्षभर कार्यरत राहणार्या मंडळांचा या वर्षापासून आढावा घेण्यात येईल. यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्या मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, अशी ग्वाही युवा उद्योजक पुनीत बालन यांनी शनिवारी दिली.
श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती-कोथरूडच्या सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर सभागृहात दैनिक ‘पुढारी’च्या वतीने शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. बालन म्हणाले, डीजेमुक्त गणेशोत्सवाची भूमिका ही माझी वैयक्तिक आहे आणि ती कायम राहणार आहे. (Latest Pune News)
त्यासाठी कारणेही तशीच आहेत. गणेशोत्सव हा सर्वसमावेशक असावा. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दैनिक ‘पुढारी’च्या सहकार्याने देखावे स्पर्धा राबविण्यात येणार आहे. शहराला गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा आहे. गणेशोत्सवात दहा दिवस सर्वांनी एकत्र येत गणेशोत्सवाचे पावित्र्य जपत उत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे.
गणेशोत्सव जेव्हा सुरू झाला, तेव्हा त्याचा उद्देश हा स्वातंत्र्यलढ्याचा होता. आता तो बदललाआहे. उत्सवाचा हेतू हा एकत्र येऊन जल्लोषात व्हावा, असा असावा. पुण्यात 27 हजारांहून अधिक ढोल-ताशा पथकात वादन, ध्वजवंदन, लेझीम, टिपर्या, ढाल-तलवार खेळणारे तरुण-तरुणी आहेत. त्यामार्फतही गणेशोत्सवाला एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, याची खात्री मंडळाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने घ्यायला हवी. गणेशोत्सव हा संस्कृतीला शोभणारा व्हावा, असेही बालन यांनी नमूद केले.