पुणे

पुण्याचे 400 सायकलस्वार किल्ले शिवनेरीवर नतमस्तक

अमृता चौगुले

लेण्याद्री(पुणे); पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून 17 ऑगस्ट 1666 ला सुटका करवून घेतली होती. तेथून सुमारे 1200 मैलांचा प्रवास करीत राजगडावर 30 ऑगस्टला पोहचले होते. या घटनेच्या स्मरणार्थ इंडो अ‍ॅथलेटिक्स सोसायटीतर्फे शनिवारी (दि. 2) मोशी-जुन्नर-ओझर-पुणे अशी 200 कि. मी. सायकल रॅली आयोजित केली होती.

गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, यंदा 425 सायकलस्वार सहभागी झाले होते, अशी माहिती आयएएसचे गजानन खैरे, अजित पाटील व गणेश भुजबळ यांनी दिली. आरोग्य व पर्यावरणाचा संदेश देणार्‍या या रॅलीमध्ये नऊ वर्षांच्या चिमुरड्यापासून ते 73 वर्षांचे आजोबा पावसाच्या सरी झेलत सहभागी झाले होते. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर पोलिस निरीक्षक नारायण पवार, निसर्ग अभ्यासक यश मस्करे आदींनी त्यांचे स्वागत केले.

या वेळी मोशी, खेड, नारायगावगाव, जुन्नर, शिवनेरी ते लेण्याद्री असा प्रवास करणार्‍या सायकलस्वारांनी ओझरला मुक्काम केला. रविवारी (दि. 3) पहाटे ते पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत, अशी माहिती मदन शिंदे, दादासाहेब नखाते, प्रशांत तायडे आणि अविनाश चौगुले यांनी दिली.

या रॅलीच्या नियोजनामध्ये गिरीराज उमरीकर, अमित पवार, रमेश माने, सुशील मोरे, श्रीकांत चौधरी, मारुती विधाते, प्रतीक पवार, सुशील मोरे, श्रेयस पाटील, अजित गोरे, अमित पवार, अविनाश अनुशे, प्रणय कडू, श्रीकांत चौधरी, प्रदीप टाके, प्रतीक पवार, कैलास तापकीर, प्रकाश कांबळे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरु सायकल क्लब, नारायणगाव येथे साई संस्थान, शिवनेरी अ‍ॅथलेटिक असोसिएशन, श्रीराज हॉटेलतर्फे रॅलीचे स्वागत करण्यात आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT