Ink And Marker Pudhari
पुणे

Pune Indelible Ink Election: मार्कर पेनच्या गोंधळानंतर पुन्हा पारंपरिक शाई; जि.प.–पं.स. निवडणुकीसाठी आयोगाचा निर्णय

पुणे जिल्ह्यासाठी 10,800 इंडेलिबल इंक बॉटल उपलब्ध; 7 फेब्रुवारीला मतदान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका निवडणुकीदरम्यान मतदानानंतर मतदारांच्या बोटाला लावण्यात आलेल्या मार्कर पेनवरून गोंधळ उडाला होता. अनेक ठिकाणी मार्करची शाई पुसली जाणे, ती स्पष्ट दिसत नसणे, यावर मतदारांकडून आक्षेप घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पारंपरिक इंडेलिबल इंक शाई वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्ह्यासाठी म्हैसूर येथून 10 हजार 800 शाईच्या बॉटल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी येत्या 7 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 605 मतदान केंद्र उभारली आहेत. या सर्व केंद्रांवरील प्रत्येक मतदान बुथवर किमान दोन शाईच्या बॉटल ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शाई कमी पडण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

भारतीय निवडणूक प्रक्रियेत अनेक वर्षांपासून मतदारांच्या बोटावर इंडेलिबल इंक लावण्याची पद्धत आहे. ही शाई सहजासहजी पुसली जात नाही आणि काही दिवस बोटावर टिकून राहते, त्यामुळे दुबार मतदान टाळण्यास मदत होते. या शाईचे उत्पादन मैसूर पेंट्‌‍स अँड वॉर्निश लिमिटेड या सरकारी कंपनीकडून केले जाते आणि ती देशभरातील विविध निवडणुकांमध्ये वापरली जाते. मात्र, मागील महापालिका निवडणुकीत मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता. मार्कर नीट काम करीत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही ठिकाणी शाई दिसत नव्हती, तर काही ठिकाणी लगेच पुसली जात असल्याचे मतदारांनी तक्रारी केल्या होत्या. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आयोगाने पुन्हा पारंपरिक शाई वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT