पुणे: नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी मतदानयंत्र बंद पडल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानयंत्रांची उपलब्धता दुप्पटऐवजी चारपट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 3 हजार 605 मतदान केंद्र असून, यासाठी 14 हजारांहून अधिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 5 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे.
नगरपरिषद व त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये ईव्हीएम व कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते एक तास मतदान प्रक्रिया खोळंबली होती. यंत्रांची उपलब्धता कमी असल्याने तातडीने यंत्रे बदलण्यासाठी मोठा वेळ लागत होता. परिणामी, मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर रांगा असल्याचे चित्र दिसून आले होते. या गंभीर बाबीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची उपलब्धता चारपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांच्या दुपटीहून अधिक यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार 3 हजार 605 मतदान केंद्रांसाठी 7 हजार 931 मतदानयंत्रे व 3 हजार 966 कंट्रोल युनिट देण्यात आली होती. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान यंत्रे किंवा कंट्रोल युनिट बंद पडल्यास तातडीने बदल करता यावा, यासाठी आता 3 हजार 605 मतदान केंद्रांसाठी 14 हजार 40 मतदानयंत्रे व 5 हजार 813 कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नादुरुस्त ईव्हीएम भोसरी गोदामात सीलबंद
महापालिका निवडणुकीत एकूण 1 हजार 192 मतदानयंत्रे व 812 कंट्रोल युनिट बंद पडले होते. ही सर्व नादुरुस्त यंत्रे जिल्हा प्रशासनाच्या भोसरी येथील गोदामात सीलबंद करून ठेवण्यात आली आहेत.
इंदापूरमध्ये सर्वाधिक, वेल्ह्यात सर्वांत कमी मतदान केंद्र
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 400 मतदान केंद्र असून, त्यासाठी 1 हजार 664 मतदानयंत्रे व 660 कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत, तर वेल्हा तालुक्यात सर्वांत कमी 105 मतदान केंद्र असून, तेथे 437 मतदानयंत्रे व 173 कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता मतदानयंत्रे व कंट्रोल युनिट बंद पडल्यानंतर तातडीने नवीन यंत्र व कंट्रोल युनिट बदलण्यासाठी यंत्रांची उपलब्धता चारपट करण्यात आली आहे.नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक यंत्रे व्यवस्थापन कक्ष
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेसाठी 10, तर पंचायत समितीसाठी 12 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. 27 जानेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. जिल्हा परिषदेच्या 73 गणांसाठी एकूण 621 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, तर पंचायत समितीच्या 146 गणांसाठी 1 हजार 122 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. शुक्रवारी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या 7 गणांसाठी 95 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 4 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. तसेच भोर आणि बारामती तालुक्यांतून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातून पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 127 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
त्यापैकी 6 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तसेच इंदापूर तालुक्यातून 3, तर शिरूर, खेड आणि वेल्हा तालुक्यांतून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी 611, तर पंचायत समितीसाठी 1 हजार 110 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.दि. 27 जानेवारी हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, 25 आणि 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज माघारी घेता येणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी 24 आणि 27 जानेवारी असे केवळ दोनच दिवस उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणात नेमके कोणते आणि किती उमेदवार राहणार, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.