पुणे: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. रोबोटिक्स, कोडिंग आणि नवकल्पनांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील २५० विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.
रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये करेगाव आणि लोणीकंदच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांत यश मिळविले. विशेष म्हणजे, लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील श्रीराज शिंदे आणि आरोही उजगरे यांची दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
करेगाव जिल्हा परिषद शाळेतील ५६ विद्यार्थ्यांनी फियाटच्या सहकार्याने स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये सहा विद्यार्थ्यांच्या दोन संघांनी टॉप टेनमध्ये, तर तीन विद्यार्थ्यांच्या एका संघाने टॉप थ्रीमध्ये स्थान मिळविले. लोणीकंद शाळेतील १५८ विद्यार्थ्यांनी झेडएस असोसिएट्सच्या सहकार्याने सहभाग नोंदविला. फियाट आणि झेडएस असोसिएट्सच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये रोबोटिक्स, कोडिंग, एसटीईएम शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. रोबोटेक्स इंडिया ही संस्था सरकारी व निमशहरी शाळांमधील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे अभिनंदन केले.
‘स्कोव्हेरा’ ॲपची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
लोणीकंद शाळेतील सहावीचा श्रीराज अभिजित शिंदे आणि सातवीची आरोही रामचंद्र उजगरे यांची दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. हे दोघेही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या विद्यार्थ्यांनी ‘स्कोव्हेरा’ नावाचे बहुभाषिक शैक्षणिक ॲप विकसित केले आहे. इंटरनेटशिवाय कार्य करणाऱ्या या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती, सुरक्षा, शैक्षणिक माहिती आणि पालक-शिक्षक संवाद सुलभ होणार आहे.