School Meal Laboratory Testing Pudhari
पुणे

PM Poshan: पोषण आहारातील धान्याची आता प्रयोगशाळेत तपासणी; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

बारामती, दौंड, शिरूरमधून यादृच्छिक नमुने घेणार; साठवणूक, वजन आणि अन्नसुरक्षा नियमांचीही काटेकोर तपासणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील धान्याच्या गुणवत्तेवर आता जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी शाळांनी उपलब्ध साठा आणि प्रत्यक्ष गरज लक्षात घेऊनच तांदूळ व अन्य धान्याची मागणी नोंदवावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. अनावश्यक साठा टाळण्यासोबतच धान्याची गुणवत्ता, साठवणूक आणि अन्न सुरक्षा नियमांच्या पालनाची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील शाळांमध्ये निश्चित साप्ताहिक पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. त्यासाठी तांदूळ, डाळी, कडधान्ये, मसाले आणि अन्य साहित्याचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांना निर्धारित प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण आहार मिळावा, यासाठी उपलब्ध साठ्याचा नियमित आढावा घेऊनच पुढील मागणी नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांना मिळणारा तांदूळ आणि अन्य धान्य प्रत्यक्ष वजन करूनच घ्यावा.

तसेच, पोत्यावरील उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम मुदत आणि गुणवत्तेशी संबंधित माहितीची पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. धान्याच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपवादात्मक परिस्थिती वगळता शाळांमध्ये अतिरिक्त धान्यसाठा ठेवू नये, असेही जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक आणि आहार तयार करणाऱ्या बचत गटांनी धान्याचे प्रत्यक्ष वजन करून त्याच्या नोंदी ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, अन्न सुरक्षा व मानके कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसाठी तालुकास्तरावर विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे तज्ज्ञ या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणार आहेत.

तीन तालुक्यांतील धान्याची प्रयोगशाळेत तपासणी

धान्याच्या गुणवत्तेची खातरजमा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यातील शाळांमधून यादृच्छिक पद्धतीने धान्याचे नमुने घेण्यात येणार आहेत. हे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. तपासणी अहवालाच्या आधारे आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धान्याच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT