पुणे: भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरील खडकीतील चर्च चौकात मंगळवारी (दि.४) सकाळी घडली. संबंधित तरुणदेखील दुचाकीवर होता. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
शाहीद रशीद शेख (वय ३७, रा. येरवडा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ आसिफ रशिद शेख (वय ४०, रा. पंचशीलनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद शेख हे येरवडा येथील रहीवासी असून, एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी (दि. ४) खडकीतील चर्च चौकात ते दुचाकीवर सिग्नलला थांबले होते. सिग्नल क्रॉस करताना भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात ते खाली कोसळले. गंभीर जखमी झाल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. खडकी पोलीस पुढील तपास करीत आहेत.