

पुणे: येरवडा कारागृह प्रशासनाने महिला कैद्यांसाठी 'रेडिओ तरंग' हा कक्ष सुरू केला आहे. आयुष्यात होणाऱ्या चुका, अपराधांची शिक्षा भोगावी लागते. कारागृहातील आयुष्यात बाह्य जगताशी संपर्क तुटतो. विशेषत: महिला कैदी कारागृहात एकाकी पडतात. त्यांच्या आयुष्यात आनंद, तसेच नवी उमेद देण्यासाठी या कक्षाची सुरूवात करण्यात आली आहे. (Latest Pune News)
'या कक्षाच्या माध्यमातून महिला कैद्यांना नामवंत वक्त्यांची भाषणे, योगविषयक मार्गदर्शन, मनोरंजनासाठी गाणी, भक्तिगीते, महिला सक्षमीकरण, कायदेविषयक माहिती देण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन किरण बेदी यांच्या हस्ते झाले. राज्यात भायखळा आणि येरवड्यात महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. भायखळ्यानंतर येरवड्यातील कारागृहात महिला कैद्यांसाठी 'रेडिओ तरंग' कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष सुरू करण्यासाठी इंडिया व्हिजन फाउंडेशनकडून विशेष सहकार्य करण्यात आले', अशी माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, महिला कारागृहाच्या अधीक्षक पल्लवी कदम यांनी दिली.
'येरवड्यातील पुरुषांच्या कारागृहात २०१४ मध्ये 'प्रिझन कम्युनिटी रेडिओ' उपक्रमांतर्गत 'रेडिओ तरंग' कक्ष सुरू करण्यात आला होता. मुंबईतील भायखळा येथील महिला कारागृहात हा कक्ष सुरू करण्यात आला होता. मात्र, येरवड्यातील महिला कारागृहात रेडिओ कक्ष नव्हता. हा कक्ष सुरू करण्यासाठी इंडिया व्हिजन फाउंडेशनने सहकार्य केले,' असे त्यांनी नमूद केले.
'रेडिओ तरंग' या कक्षाचे उद्घाटन निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी, इंडिया व्हिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष किरण बेदी यांच्या हस्ते करण्यात आले. डाॅ. सुधाकर शेट्टी, गोविंद सिंग, मोनिका धवन, सायना भरुचा, हीना कुरेशी, अमित यादव, धीरज गुप्ता, वैभवी मनुकर, हर्षदा मोडक, रिया खंदुरी या वेळी उपस्थित होते. कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डाॅ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, महिला कारागृहाच्या अधीक्षक पल्लवी कदम, अतिरिक्त अधीक्षक माया धुतुरे, कारागृह अधिकारी निर्मला बांदल, भाग्यश्री गवळी यांनी रेडिओ कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
महिला कैद्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण
राज्यात भायखळा आणि येरवड्यात स्वतंत्र महिला कारागृह आहेत. येरवड्यातील महिला कारागृहात सध्या ३०० कैदी (बंदी) आहेत. त्यांपैकी १०० महिला कैद्यांना शिक्षा झालेली आहे. उर्वरित महिला न्यायाधीन बंदी आहेत. त्यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. 'रेडिओ तरंग' कक्षामुळे कारागृहातील महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. महिलांच्या फर्माईशीनुसार भक्तिगीते, मनोरंजनात्मक गीते, तसेच कायदेविषयक योजनांची माहिती देण्यात येते, अशी माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली.