वाघोली: येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील बिटिशकालीन ऐतिहासिक (अँटिक) साहित्य जपून ठेवण्याऐवजी हे साहित्य भंगारात देण्यात आले आहे. तर स्वच्छतेचे अधिकृत कंत्राट असलेल्या लोकराज्य सहकारी संस्थेचे तब्बल 20 महिन्यांचे देयक (बिल) थकल्याने या संस्थेने काम बंद केले आहे. त्यामुळे मनोरुग्णालयात स्वच्छतेची जबाबदारी रोजंदारीवरील कामगारांना देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात मात्र रुग्णांकडूनच स्वच्छता व इतर कामे करून घेतली जात असल्याचे वास्तव आहे.
रुग्णालयात स्वच्छता करणाऱ्या कंत्राटी कामगार संस्थेचे मागील 20 महिन्यांचे सुमारे पावणेतीन कोटी रुपये देयक मनोरुग्णालय प्रशासनाने अदा न केल्याने ठेकेदाराने 1 एप्रिल पासून स्वच्छतेचे काम बंद केले आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र जेवढे काम केले होते तेवढे देयक संबंधित ठेकेदाराला अदा केले आहे. रुग्णांकडून काम करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी दिली. मनोरुग्णालयाचा भोंगळ कारभार सुरू असून अनेक किस्से समोर येत आहेत.
मनोरुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराच्या दैनिक ‘पुढारी’मध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सदर रुग्णालय हे बिटिश कालीन आहे. बिटिशांनी रुग्णालयात वापरलेले साहित्य होते. हे साहित्य हेरिटेज वस्तू म्हणून जतन केले जात होते. मात्र, या वस्तू चक्क भंगारात विकण्यात आल्या आहेत. यासाठी कोणी परवानगी दिली, याची चौकशी होणे गरजेचे आहे. रुग्ण असलेल्या वॉर्डात स्वच्छता का होत नाही, याबाबत पत्रकारांनी सखोल माहिती घेतली असता स्वच्छता कंत्राटदाराला 20 महिन्यांपासून देयकाची रक्कम अदा करण्यात आली नव्हती. त्यामुळे कंत्राटदाराने 1 एप्रिलपासून काम बंद ठेवले आहे. स्वच्छतेचे काम बंद केल्याने रुग्णच आपल्या वॉर्डात स्वच्छता करत असल्याचे चित्र सध्या वॉर्डात पाहायला मिळत आहे.
साठेमारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चलती
मनोरुग्णालयात सुमारे 800 कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांवर देखरेख करण्यासाठी एक सुपरवायझर आहे. याशिवाय अधीक्षकांच्या मर्जीतील एक कर्मचारी आहे. त्याचा रुग्णालयाच्या आवारात चांगला दबदबा आहे. हे महाशय कधीही युनिफॉर्म, आयकार्ड घालत नाहीत. इतर कर्मचाऱ्यांवर व रुग्णालयात येणाऱ्यांवर ते रुबाब दाखवतात. साठेमारी करत वसुलीही करत असल्याची चर्चा असून त्या कर्मचाऱ्याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
रुग्णांच्या अंतरवस्त्रांमध्येही भष्टाचार?
रुग्णांना अंतरवस्त्र (अंडरगारमेंट) का दिली जात नाहीत, असे अधीक्षकांना विचारले असता, काही रुग्ण ती घालत नाहीत. मात्र, जे वापरतात त्यांना दिली जातात. अंडरगारमेंटमध्ये आपण पदावर नसताना भष्टाचार झाला होता. त्यावेळी आपण पदावर नव्हतो, असे श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले.
दरमहा देयक देऊनही पैसे नाहीत
याबाबत स्वच्छता ठेकेदार विजय कांबळे म्हणाले, मी दरमहा बिल सादर केले होते. अधीक्षकांनी सांगितलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. तरीही ते बिल अडवून ठेवतात. कर्मचाऱ्यांना देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे 1 तारखेपासून काम बंद केले आहे. मी काम केलेले पूर्ण बिल मिळावे अशी आपली मागणी आहे.
ऐतिहासिक साहित्य बांधकाम विभागाकडे सोपविण्याचा निर्णय करारानुसार वरिष्ठ स्तरावर झाला आहे. रुग्णालयात रोजंदारीवरील स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत. त्यांना पगार व इतर देयके ‘पीएफ, ईएसआय’ सुरक्षा पुरवली जाईल.श्रीनिवास कोलोड, अधीक्षक, मनोरुग्णालय, येरवडा