पुणे

Pune : शिक्षण, आरोग्यासाठी काम करणार : नवनियुक्त जि. प. सीईओ संतोष पाटील

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण आणि आरोग्य हे नागरिकांच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या दोन बाबी आहेत. शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा नागरिकांना चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी प्रयत्नशील राहील. शिक्षण व्यवस्था अधिकाधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी शिक्षकांच्या कौशल्याचा वापर करून दर्जेदार शिक्षणावर भर देण्याकडे लक्ष असेल. तसेच खानवडी येथील मुलींची शाळा व वसतिगृह उभारण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संतोष पाटील यांनी सांगितले. तसेच दुष्काळी परिस्थितीवरही लक्ष असणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे सीईओ रमेश चव्हाण यांची बदली झाली. त्याठिकाणी कोल्हापूर झेडपीचे सीईओ संतोष पाटील यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी (दि. 21) पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गरजूंना लाभ मिळण्यासाठी प्रयत्नशील

जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळस्थितीत असून, पाणीटंचाईचे संकट आहे. जवळपास 59 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच जनावारांचा चार्‍यासाठी त्वरित पावले उचलली जातील. शासनाच्या योजना व निधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. गरजूंना त्याचा लाभ मिळण्याचा प्रयत्न राहील, असे सीईओ संतोष पाटील यांनी सांगितले.

पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके द्या

सीईओ संतोष पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना जिल्ह्यातून भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत. सोबत ते पुष्पगुच्छ घेऊन येत आहेत. त्यांनी पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके आणावीत. ती पुस्तके मी गरजू किंवा शाळांना दान करणार, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT