Murder Case Pudhari
पुणे

Pune Crime: पुण्यात पत्नीच्या डोक्यात सिलिंडर मारून खून; आरोपी पती स्वतःच पोलिस ठाण्यात हजर

अनैतिक संबंधाच्या संशयातून संतापजनक प्रकार; येवलेवाडीतील लेबर कॅम्प परिसर हादरला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन या खुनाची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. गीता यशाजी जाधव (वय 26, रा. लेबर कॅम्प ट्रिनिटी कॉलेजच्या पाठीमागे येवलेवाडी, मूळ सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती राजेंद्र जनार्धन करचे (वय 31,रा. लेबर कॅम्प, मूळ. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई येवलेवाडी पोलिस ठाण्यात सुरू होती. ही घटना शनिवारी (दि.23) पहाटे 5 वाजताच्या सुमारास येवलेवाडी येथील लेबर कॅम्पमध्ये घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गीता जाधव ही मूळची सातारा येथील राहणारी आहे. तर, राजेंद्र हा माळशिरस तालुक्यातील असून, ठेकेदाराकडे पेंटिंगची कामे करतो. गीताचे अगोदर फलटण येथील एका व्यक्तीशी लग्न झाले होते. मात्र, ती त्याच्यापासून विभक्त होऊन राजेंद्रसोबत राहत होती. डिसेंबर 2025 मध्ये त्यांच्या दोघांचे घरच्या-घरी लग्न झाले होते. राजेंद्रचे म्हणणे होते, की तिने आपल्यापासून पहिले लग्न लपवून ठेवले. त्यानंतर ती आता आणखी कोणासोबत तरी बोलत होती.

त्यामुळे राजेंद्रच्या मनात गीताच्या अनैतिक संबंधाबद्दल संशय होता. त्याच कारणातून त्यांच्यात शुक्रवारी रात्री वाद झाला. त्यानंतर शनिवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्याने गीताच्या डोक्यात घरातील पाच किलोचा गॅस सिलिंडर मारून तिचा खून केला. त्यानंतर तो खोलीचा दरवाजा लावून पसार झाला होता. गावी जाण्याच्या विचारात राजेंद्र होता. दिवसभर तो शहरात फिरला. मात्र, सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास त्याने येवलेवाडी पोलिस ठाण्यात हजर होत मी माझ्या बायकोचा खून केला, असे पोलिसांना सांगितले. तिचा मृतदेह खोलीत पडला आहे.

त्याने ही माहिती देताच येवलेवाडी पोलिसांनी तत्काळ तो राहत असलेल्या लेबर कॅम्पकडे धाव घेतली. खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता, त्यांना गीता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गीताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला होता.

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात गॅस सिलिंडर मारून तिचा खून केला. आरोपी पतीनेच पोलिस ठाण्यात येऊन ही माहिती दिली. त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
मारुती पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येवलेवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT