पुणे: आयातीची पडतळ वाढल्याने सर्वच खाद्यतेलांच्या दरात 15 किलो/लिटरच्या डब्यामागे आणखी 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली. हमीभावात शासकीय खरेदी सुरू झाल्याने तूरडाळीचे दरही आणखी पाचशे रुपयांनी वाढले. मिलबर गव्हाच्या दरवाढीमुळे आटा, रवा आणि मैदाही 50 किलोच्या पोत्यामागे आणखी पन्नास रुपयांनी महागल्याचे सांगण्यात आले. आवक कमी असल्याने शेगदाण्याच्या दरातही क्विंटलमागे आणखी पाचशे रुपयांनी वाढ झाली. मात्र आवक-जावक साधारण असल्यामुळे साखर आणि इतर जिनसांचे दर स्थिर होते.
अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेमुळे जगात अशांतता निर्माण झाली असून त्याचे पडसाद बाजारपेठेवर उमटू लागले आहेत. अमेरिका, रशिया आणि युक्रेनमधील तणावाच्या वातावरणामुळे भारतात होणाऱ्या खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. विशेषतः सूर्यफूल तेलाच्या आयातीवर विपरित परिणाम झाला आहे. खाद्यतेल निर्यातदार देशांमध्येच सध्या सूर्यफूल तेलाच्या दरात टनामागे सुमारे 60 डॉलर्सची तर सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात 450 डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यातच भारतीय रुपयाच्या तुलनेने अमेरिकेन डॉलरच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे खाद्यतेलांची आयात उंच दरात होत आहे. यामुळे गेल्या आठवड्यात सूर्यफूल तेलाच्या दरात 15 लिटरच्या डब्यामागे 50 ते 75 रुपयांनी तर अन्य खाद्यतेलांच्या दरात 30 रुपयांनी वाढ झाली. वनस्पती तुपाचे दरही 25 रुपयांनी वाढले. मात्र मागणी कमी असल्यामुळे खोबरेल तेलाचे दर स्थिर होते.
साखर स्थिर, गुळाची भाववाढ कायम
बाजारात साखरेची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. मात्र मागणी कमीच असल्याने गेल्या आठवड्यात साखरेचे दर टिकून असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 3 हजार 950 ते 4 हजार रुपये होता. संक्रांतीनंतर गुळास मागणी कमी झाली आहे. मात्र उसाचा तुटवडा जाणवत असल्याने दरही वाढले आहेत. यामुळे संक्रांतीनंतर गुळास मागणी कमी झाली असली तरी अपेक्षित असलेली घसरण झालेली नाही.
तूरडाळ आणखी महागली, अन्य डाळी स्थिर
महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून हमी भावात म्हणजेच प्रतिक्विंटल आठ हजार रुपये या दराने तुरीची खरेदी सुरू झाल्यामुळे हंगामकाळातच तुरीचे दर वाढले आहेत. यामुळे गेल्या आठवड्यात तूरडाळीच्या दरात क्विंटलमागे आणखी 500 ते 600 रुपयांनी वाढ झाली. मात्र आवक-जावक साधारण असल्यामुळे अन्य डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर होते.
बाजारात आवक होणाऱ्या मालापैकी हलक्या मालाचे प्रमाण अधिक असून भारीचा तुटवडा आहे. यामुळे गेल्या आठवड्यात हलक्या, मध्यम तसेच भारी प्रतीच्या शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे आणखी पाचशे रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:
साखर (प्रतिक्विंटल) 3900-3950 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2500-2600, रिफाईंड तेल 2175-2900, सरकी तेल 1970- 2300, सोयाबीन तेल 1950-2300, पामतेल 2000-2200, सूर्यफूल रिफाईंड तेल 2250-2400, खोबरेल तेल 4800, वनस्पती 1820-2270 रु., तांदूळ :- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसुरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 12500-14000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ एक्स्ट्रा 4600-4700, गूळ नं. 1 4350-4550, गूळ नं.2 4000-4200 गूळ नं.3 3800-3950,नं. 4 - 3600-3750, बॉक्स 4000-5000 रु. डाळी:- तूरडाळ 9000-11600, हरभराडाळ 6800-7000, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7300-7400, शेंगदाणा :- जाडा 1000-10600, स्पॅनिश 11000-11500, घुंगरु 11000-15000 टीजे 9000-9500 रु.