आशिष देशमुख
पुणे: शहराची लोकसंख्या जसजशी वाढत आहे, तशी पुणेकरांची तहान वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, शहरात दररोज 1500, तर पिंपरी-चिंचवड भागात 650 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) इतके पाणी वापरले जात आहे, असा अहवाल केंद्रीय भूजल सर्वेक्षण, केंद्रीय भूजल मंडळ आणि विकास संस्थांनी केलेल्या निरीक्षणातून दिला आहे. शहराजवळील धरणात यंदा मुबलक पाणीसाठा असला तरीही बहुतांश भागाच्या भूर्गभातील पाणीपातळी खोल जात आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, असा सल्ला या अहवालातून देण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर सातत्याने वाढत असून, 2025-26 या वर्षात पुणे शहरात दररोज 1500 एमएलडी, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 650 एमलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी वापर होत आहे. यंदा एप्रिल-मेदरम्यान धरणांमधील पाणीसाठा 49 ते 41 टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज असून, उन्हाळ्यात टँकर वापर वाढण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांत टँकर वापरात लक्षणीय वाढ झाल्याने जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनावर भर देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
रविवारी होतो पाण्याचा अतिरिक्त वापर
शहरात दररोज 1400 ते 1460 एमएलडी पाणी लागते. सोमवार ते गुरुवार हा दर असतो. मात्र, जसा वीकेंड सुरू होतो तसे पुणेकर जास्त पाणी वापरतात अशी नोंद अहवालात आहे. शुक्रवार ते रविवार त्यात वाढ होऊन रविवारी सर्वाधिक 1500 एमएलडीपर्यंत पाणी वापरले जाते, तर पिंपरी-चिंचवड भागात 600 एमएलडी ते 650 एमएलडी पाण्याचा असाच वापर होतो. त्याचा दिवसागणिक आलेख अहवालात दिलेला आहे.