Water Tanker Pudhari
पुणे

Pune Water Tanker Accident: टँकरचालक आणखी किती निष्पापांचे बळी घेणार? कोंढवा-वानवडीतील स्थानिकांचा सवाल

परिवहन कार्यालय, वाहतूक पोलिस नेमके काय करतात?

पुढारी वृत्तसेवा

सुरेश मोरे

कोंढवा: तहानलेल्या लोकांना पाण्याचे टँकर घेऊन जातायत की निष्पाप लोकांचे बळी घेण्यासाठी टँकरचालक बाहेर पडताहेत? आठवडाभरात वानवडी-कोंढवा परिसरात टँकरचालकांनी एकापाठोपाठ लोकांना चिरडून टाकले. ऐन उमेदीच्या बहरात हे लोक गेल्यामुळे त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

एवढा भीषण प्रकार घडून देखील प्रशासनाकडून टँकरचालकांवर वचक बसवली जात नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिस झोपा काढत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

कोंढवा, वानवडी, महंमदवाडी परिसरात पाण्याच्या टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बारमाही या भागातील टँकर चालूच असतात. उन्हाळा म्हणजे पाण्याच्या टँकरची संख्या जास्त पाहायला मिळते. रात्रंदिवस जास्तीत जास्त ट्रिप, फेऱ्या मारण्यासाठी टँकरचालकांची चढाओढ लागली जाते.

अशा या घाईतच त्यांना रस्त्याने जाणारी निष्पाप व्यक्ती दिसत नाही. टँकरमालकाला, पाणी विकणाऱ्यांना व टँकरचालकांना फक्त पैसा हवा आहे. ज्या निष्पाप लोकांचे बळी गेलेत, त्याचे सोयरसुतक या लोकांना नसते.

उमेदीच्या काळात लोकांचे प्राण गेले. कुटुंबातील लोक टाहो फोडताहेत, त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहचत नसेल का? का झोपेचे सोंग घेतलेय. बेभान वेग, कर्णकर्कश हॉर्न वाजवत टँकरचालक पळताहेत. रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस कर्मचारी यांच्या लक्षात ही बाब येत नाही का? का सर्वांनीच डोळ्यांवर व कानावर हात ठेवलेत, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

पाण्याच्या टँकरची अवस्था पाहूनच घडलेल्या घटनांमुळे अन्य चालकांच्या अंगावर काटा येतो. ते आपले वाहन बाजूला घेतात व त्यांना वाट करून देतात. वर्षानुवर्षे काही टँकर आहेत तसेच आहेत. मग यांचे पासिंग होत नाही का? काहींच्या नंबरप्लेट गायब झाल्या आहेत. हेडलाइट, साइड सिग्नल लाइटचा पत्ताच नसतो.

गुटखा खाऊन टँकरचालक बेभान असतात. काही चालक नशा करून गाड्या चालवतात, असे गंभीर आरोप नागरिक करीत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय काय करीत आहे? स्थानिक पोलिस प्रशासनाचे कोणी हात बांधले आहेत का? टँकरमधील पाणीगळती दुचाकीस्वारांच्या मुळावर आहे. रस्त्यावर पडलेल्या पाण्यावरून घसरून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.

जबाबदारीने टँकर चालवा

उन्हाळा आहे, लोकांना पाणी मिळायला हवे. पण, जबाबदारीने टँकर चालवा! ओठांवर मिशी फुटली नाही असे ड्रायव्हर पाण्याच्या टँकरवर पाहायला मिळतात. यांच्याकडे अवजड वाहन चालविण्याचे परवाने आहेत का? टँकरमालकांनी आता विचार करायला हवा. चालकाचा परवाना तो नशा करीत नाही ना, जड वाहन चालविण्याचा अनुभव तपासणे गरजेचे आहे. ज्यांचे प्राण गेलेत ते स्वस्त नाहीत, भविष्यात देशाचे नाव उज्ज्वल करणारा नॅशनल फुटबॉल खेळाडू आरिज शेख होता. त्याच्या कुटुंबाची अवस्था पाहा. भविष्यात दुसरा बळी जाणार नाही, याची काळजी टँकरमालकांनी घ्यायला हवी, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT