पुणे: अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पुढील वर्षी पावसाच्या अनिश्चिततेची शक्यता आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पुणे महापालिकेने आगामी आर्थिक वर्षासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
२०२६-२७ या वर्षासाठी पुणे शहराला २१.३४ टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करीत उपलब्ध जलसाठा, खडकवासला धरण साखळीतील पाण्याची स्थिती आणि भविष्यातील वाढती मागणी विचारात घेऊन आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याची विनंती महापालिकेने केली आहे.
दरम्यान, हे पत्र पाठवून दोन दिवस उलटूनही कोणतेही उत्तर पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला मिळालेले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पुढच्या वर्षी पाऊस होणार की नाही, याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी आतापासून पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता (विद्युत) बुधवारी (दि. ३०) पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. शहराची वाढती लोकसंख्या, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे आणि पाण्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी देखील महापालिकेने पाटबंधारे विभागाला केली आहे.
महापालिकेत २०१७ मध्ये ११, तर २०२१ मध्ये २३ गावांचा समावेश झाला आहे. या गावांसह शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारणारी नागरी वस्ती यामुळे पाणीपुरवठ्याची जबाबदारी वाढली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांनाही महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करावा लागत असल्याने एकूण पाण्याची मागणी विचारात घेऊन आरक्षण वाढविण्याचा प्रस्ताव यापूर्वी सादर केला आहे.
जलसंपदा विभागाच्या २० सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार विहित नमुन्यात पाणी आरक्षणवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही केली आहे. तसेच, २०२६-२७ या वर्षासाठी २१.३४ टीएमसी पाण्याची आवश्यकता दर्शविणारा प्रस्तावही सादर केल्याचे पत्रात नमूद केले आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून अद्याप पाणी अंदाजपत्रक प्राप्त झाले नसल्याचे महापालिकेने निदर्शनास आणून दिले आहे.
यंदा अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पर्जन्यमान अनिश्चित राहण्याची किंवा पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
परिणामी, धरणांमधील पाणीसाठा आणि उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा, पाटबंधारे विभागाचे पाणी अंदाजपत्रक, कालव्यांमधील आवर्तने आणि पर्जन्यमानातील संभाव्य अनिश्चितता या सर्व बाबींचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आगामी वर्षातील पाण्याची गरज आणि उपलब्धता यांचा ताळमेळ घालून नियोजन करावे. तसेच, भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पुणे महापालिकेसाठी आवश्यक पाणी आरक्षित करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी विनंती पाटबंधारे विभागाला केली आहे.
जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती स्थगित
जुन्या जलवाहिनीची गळती आणि जोडांशी संबंधित दुरुस्ती करण्यासाठी सुमारे दोन महिने वाहिनी बंद ठेवून कालव्यातून पाणी उचलण्याचे नियोजन होते. मात्र, हे काम सध्या स्थगित केल्याचे नंदकिशोर जगताप यांनी सांगितले. दुरुस्तीचे सुधारित वेळापत्रक अद्याप स्पष्ट केलेले नाही, असेही ते म्हणाले.
दहा टक्के कपातीबाबत निर्णय बाकी
राज्य शासनाने विविध शहरात दहा टक्के पाणीकपातीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, संबंधित अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कपातीची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत निर्णय झालेला नाही. यापूर्वी नंदकुमार जगताप यांनी शहरासाठी दररोज १,६५० एमएलडी पाणी उचलले जात असून, नियमित पुरवठा सुरू असल्याचे सांगितले.
मोठ्या प्रकल्पांसाठी पाणी कुठून?
पुण्यात एचसीएमटीआर, रिंगरोड यांसारखे मोठे प्रकल्प पुढील काळात वेगाने सुरू होणार आहेत. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी होऊ नये, यासाठी एसटीपीमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढविणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या पत्रातील प्रमुख मागण्या
सन २०२६-२७ साठी आवश्यक पाण्याची उपलब्धता स्पष्ट करावी.
धरणसाठा आणि कालव्याचे आवर्तन विचारात घेऊन पाणीवाटप करावे.
पाटबंधारे विभागाचे पाणी अंदाजपत्रक उपलब्ध करावे.
पुण्यासाठी पाणीवापराचे नियोजन कळवावे.
भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन आवश्यक पाणी आरक्षित ठेवावे.
सध्या नियमित पुरवठा सुरू आहे. पाठबंधारे विभागाला पाठवलेले पत्र पाणीकपातीचा आदेश नसून पाणी नियोजनाची मागणी आहे. शासनाचा आदेश मिळाल्यानंतर आयुक्त आणि पक्षनेत्यांच्या बैठकीत कपातीबाबत निर्णय घेतला जाईल.- नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख, पुणे महापालिका