पुणे: एक गळका नळ तासाभरात बादलीभर पाणी वाया घालवतो, तर दिवसाला १४०० लिटर पाणी त्यातून वाया जाते. त्याअनुषंगाने वर्षाचा हिशेब केला, तर एका गळक्या नळातून तब्बल पाच लाख लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे शहरातील गळके नळ आणि गळक्या टाक्या तत्काळ दुरुस्त करण्याची गरज असल्याचे मत जलसंरक्षण प्रबोधिनीचे संस्थापक मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केले आहे.
यंदा जूनचे २० दिवस उलटले तरी पावसाचा पत्ता नाही. सर्वच धरणातील पाणी संपत चालले, तर शहराची तहान दिवसेंदिवस उन्हामुळे वाढत आहे. अशा वेळी पाणी वापरण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. याच विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रयोग करून समाजाला विविध उपाय सांगणारे जलसंरक्षण प्रबोधिनीचे संस्थापक, मुख्यमंत्री यांनी सांगितलेल्या या टिप्स सर्वांच्याच उपयोगाच्या आहेत. त्या अमलात आणल्या तर प्रत्येक जण आपापल्या परीने शहरासाठी पाणी वाचवू शकतो. 'वॉटर सेव्ह, इज वॉटर गेन' या न्यायाने त्यांनी सांगितलेल्या टिप्स वाचा आणि अमलात आणा.
मकरंद टिल्लू यांनी सांगितलेले पाणीबचतीचे उपाय दररोज आपण भाज्या ज्या पाण्याने धुतो ते पाणी फेकून न देता झाडांना घालू शकतो. बाटल्यांमध्ये उरलेले पाणी शिळे झाले, असे समजून ते फेकून देतो. पण पाणी कधी शिळे होत नाही. ते पाणी झाडांना घालता येते. प्रत्येक सोसायटीने वाहने धुण्यासाठी पाईपचा वापर बंद करावा. बादली आणि फडके यांचा वापर करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
शहरातील अनेक टाक्या गळत आहेत. त्यासाठी महापालिकेने एक व्हाट्सॲप नंबर द्यायला हवा. त्यावर तक्रार नोंदवली की, त्या लगेच दुरुस्त करण्याची सुविधा केली पाहिजे. गळके नळ बदलले तर भरपूर पाणी बचत होऊ शकते. एक नळ गळका असेल आणि करंगळीपेक्षाही बारीक धारेने गळत असेल तर एक तासाला किमान एक बदलीभर पाणी वाया जाते. दिवसभरात १४०० लिटर, तर ३६५ दिवसांचा हिशेब केल्यास ५ लाख लिटर पाणी वाया जाते. प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणचे गळके नळ शोधून गंजलेल्या नळांच्या चाव्या बदलायला हव्यात.
पीटीएमटी नावाच्या मटेरियलपासून तयार केलेल्या तोट्या मिळतात. पुणे रेल्वे स्थानकावर असे नळ बसवलेले आहेत. ते बसवले तर लवकर खराब होत नाहीत. आम्ही आठ वर्षांपूर्वी भरत नाट्य मंदिर, टिळक स्मारक येथे हे नळ बसवले. ते आजही सुस्थितीत आहेत. प्रामुख्याने हाउसिंग सोसायटी आणि शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी भरपूर जागा आहेत. तिथे त्याचा प्रयोग केला पाहिजे. एक झाड तोडले की महापालिका २० झाडे लावायला सांगते. तसेच जमिनीखालचे पाणी काढले असेल तर त्या मोबदल्यात तेवढ्याच पाण्याची सोय करून द्यायला हवी, हा नियम लागू करावा. तरच शहरातील पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे होईल.