Watter Supply Cut Off Pudhari
पुणे

Pune Water Cut: पुण्यात 15% पाणीकपात; कमी पावसाच्या इशाऱ्यानंतर महापालिकेला आदेश

खडकवासला प्रकल्पातील पाणी जपण्यासाठी निर्णय; टंचाई टाळण्यासाठी आत्तापासून नियोजन सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज वर्तविला आहे. ही बाब लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा 31 जुलैपर्यंत कसा पुरविता येईल, याचे नियोजन करावे लागणार आहे. परिणामी, पुणे महापालिकेने आत्तापासूनच महिन्याला उचलल्या जाणाऱ्या पाणीकोट्यात 15 टक्के कपात करावी, असे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत.

अशाच सूचना पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसी या विभागांना देखील केलेल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या मान्सूनवर ‌‘अल निनो‌’ व ‌‘आयओडी‌’चा प्रभाव असल्याने पर्जन्यमान कमी राहण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या काटेकोर वापरासंदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी महापालिकेला याबाबत महिन्याच्या उचलण्यात येणाऱ्या पाणीकोट्यात 15 टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यात अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झाल्यास आत्तापासूनच पेयजलाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

जेणेकरून 31 जुलैपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे शक्य होईल आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आपल्या स्तरावर योग्य ते नियोजन करावे, असेही देशमुख यांनी महापालिकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT