पुणे: शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासगी टँकरचालकांकडून नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट, टँकर भरणा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवरून पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
“महापालिकेचे कर्मचारी पैसे मागतात, खासगी टँकर चालक पाच-पाच हजार रुपये आकारतात आणि अधिकारी फोनही उचलत नाहीत. शहरात टँकरमाफियांचेच राज्य सुरू आहे,” अशा शब्दांत सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
शहरात दिवसाआड पाणीकपात सुरू आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन खासगी टँकरचालक नागरिकांची लूट करत असल्याच्या तक्रारी येत आहे. यावर सर्वसाधारण सभेत नगरसेवक सतीश लोंढे यांनी टँकर व्यवस्थेवर उपस्थित केलेल्या लेखी प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.
या वेळी विविध प्रभागांतील पाणीटंचाई आणि टँकर व्यवस्थेतील अनियमिततेची उदाहरणे नगरसेवकांनी सभागृहात मांडली. नगरसेवक पुनीत जोशी यांनी पटवर्धनबाग टँकर भरणा केंद्राचा मुद्दा उपस्थित करत, “येथून दररोज ५० ते ६० टँकर भरले जातात. त्यापैकी ३० ते ४० टँकर खासगी व्यक्तींना दिले जात असल्याचा संशय आहे.
येथे उघडपणे काळाबाजार सुरू असून, महापालिकेच्या टँकरनाच पाणी भरण्याची परवानगी द्यावी,” अशी मागणी केली. हेमलता मगर यांनी मगरपट्टा सिटी परिसरातील तीव्र पाणीटंचाईकडे लक्ष वेधत, अनेकदा संपर्क साधूनही टँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली.
अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचाही त्यांनी आरोप केला, तर दत्ता बहिरट यांनी चतु:शृंगी टँकर भरणा केंद्रावर खासगी टँकरची वाढती गर्दी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गैरव्यवहाराकडे लक्ष वेधत नियंत्रणाची मागणी केली.
या चर्चेत प्रशांत तुपे, व्यंकोजी खोपडे, गणेश कल्याणकर, रूपाली धावडे, काका चव्हाण, प्रशांत जगताप, नितीन गावडे, आशिया शेख आणि प्रियंका शेंडगे यांनीही सहभाग घेत प्रशासनाला धारेवर धरले.
यावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, “धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने शहरात २५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. सध्या आठ टँकर भरणा केंद्रे सुरू असून, आणखी तीन केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू असून, खासगी टँकरच्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी दोन ते तीन दिवसांत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.”
खोटी माहिती दिल्याने खडसावले
पर्वती टँकर भरणा केंद्रावर दररोज किती टँकर भरले जातात, असा प्रश्न नगरसेवक सचिन मोरे यांनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाकडून दररोज सुमारे ४५० टँकर भरले जात असून, त्यापैकी ३०० महापालिकेचे आणि १५० खासगी टँकर असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या आकडेवारीवर आक्षेप घेत मोरे म्हणाले, “खोटी माहिती देऊ नका. प्रत्यक्षात सुमारे ८० टक्के पाणी खासगी टँकरचालक भरत असून, ते नागरिकांऐवजी बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिकांना विकले जात आहे.” त्यांच्या या आरोपामुळे सभागृहात काही काळ गदारोळ झाला.
नगरसेवकांचे प्रमुख आक्षेप
टँकर भरणा केंद्रांवरील नोंदींमध्ये मोठी तफावत आहे.
रामटेकडी टँकर पॉइंटवरील नोंदवही कचऱ्यात फेकल्याचा आरोप.
नागरिक आणि नगरसेवकांच्या मागण्यांना प्राधान्य दिले जात नाही.
नवीन टँकर भरणा केंद्रे सुरू करण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. टँकर व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण नसल्याने टँकरमाफियांचे फावले आहे.
बांधकाम व्यावसायिकांच्या बोअरवेलमधील पाणी व्यावसायिक स्वरूपात विकले जात आहे.
खासगी टँकरचालकांकडून पाच हजार रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत.