वाघोलीत कौटुंबिक वादातून आईकडून मुला-मुलीवर चाकूने हल्ला
११ वर्षीय साईराज जयाभायचा जागीच मृत्यू
मुलगी धनश्री जयाभाय गंभीर जखमी; उपचार सुरू
आरोपी आई सोनी जयाभाय पोलिसांच्या ताब्यात
पती-पत्नीतील वादातून प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती
पुणे : पुढारी वृत्तसेवा
पतीचे दारुचे व्यसन, त्यातून सुरू झालेला कौटुंबिक कलह पोटच्या चिमूकल्याच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार वाघोली येथील बाईफ रोड परिसरात घडला आहे. आईने आपल्या अकरा वर्षीय मुलाचा विळ्याने गळा चिरून खून केला. हा प्रकार त्याच्याच तेरा वर्षाच्या बहीणीसमोर घडला. ज्यावेळी आई आपल्या मुलाचा विळ्याने गळा चिरत होती, त्यावेळी त्याची बहीण माझ्या दादाला वाचवा...माझ्या दादाला वाचवा असा आर्त टाहो फोडत होती.
मुलीचा आवाज घरमालकाने ऐकल्याने बचावली
मुलगी मदतीसाठी आवाज देत होती. तो आवाज सुदैवाने घरमालकाच्या कानावर पडला. त्यामुळे ती थोडक्यात बचावली. साईराज संतोष जायभाय (वय 11) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आई-वडीलांच्या वादात त्याचा बळी गेला आहे. तर त्याची बहीण धनश्री (वय 13) हिच्या गळ्यावर देखील तिच्या आईने वार केले आहेत. याप्रकरणी, समीर रफीक पठाण (वय 24,रा. पठाण हाईटस् बिल्डींग) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोनी संतोष जायभाय (वय 29) हिला अटक केली आहे.
जायभाय कुटुंबिय मूळचे नांदेडचे
जायभाय कुटुंबिय हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील राहणारे आहे. कामाच्या निमित्ताने ते वाघोली बाएफ रस्त्यारील समीर पठाण याच्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होते. गेल्या दहा वर्षापासून ते पुण्यात राहतात. तर 11 जानेवारी रोजी ते पठाण यांच्याकडे भाड्याने राहण्यास आले होते. आरोपी महिला सोनी हिचा पती संतोष मजुरीचे काम करतो. संतोष याला दारुचे व्यसन आहे. त्यामुळे सोनी आणि त्याचा नेहमी वाद होत होता. दुर्देवाने हाच वाद मंगळवारी निष्पाप साईराजच्या जीवावर बेतला. साईराज पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
चिमुकल्या साईराजला काही कल्पनाच नव्हती
सकाळचे 9 वाजले होते. कदाचीत साईराजला माहिती नसावे की आपल्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस आहे म्हणून. तसे म्हटले तर त्या चिमुकल्या जिवाला काय दुनियादारीची कल्पना असावी. तो नेहमीप्रमाणे घरात बसला होता. तेवढ्यात घरमालक समीरची आई शबाना यांच्या कानावर जायभाय यांच्या घरात वाद सुरू असल्याचा आवाज कानावर आला. परंतू तो आवाज किरकोळ वादाचा नव्हता. आज आईच आपल्या पोटच्या मुलांची वैरीण झाली होती. कौटुंबिक वादाच्या रागाचं भूत तिच्या डोक्यात संचारले होते. सैताना तिच्या डोक्यावर हावी झाला होता. आज तिला कशाचचं भान राहिलं नव्हतं. शबाना यांच्या आवाजाने समीर धावत खाली आला. जायभाय यांच्या घरातून वाचवा-वाचवा असा आवाज येत होता. त्यामुळे समीर याने खिडकीतून आत डोकाऊन पाहिले. त्याला घरात रक्ताचा सडा दिसला. समीर जायभाय यांच्या घरासमोर आला. त्याने खिडकीतून पाहिले असता, तेथील चित्रपाहून काही काळ त्याच्या अंगाचा देखील थरकाप उडाला असावा.
धनश्रीने बाथरुममध्ये बांधून घेतले
धनश्री अजून मोठ्याने वाचवा-वाचवा असा आवाज देत होती. साईराज किचनच्या जवळील पाथरुमच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्याजवळ त्याची आई सोनी बसली होती. तिने साईराजचे एका हाताने डोक्याचे केस पकडले होते. तर दुसऱ्य़ा हातात विळा होता. त्याच विळ्याने तिने आपल्या पोटच्या मुलाचा गळा चिरला होता. यावेळी धनश्रीने प्रसंगावधान दाखवत बाथरुमध्ये स्वतःला बंद करून घेतले होते. ती तेथूनच तिला आणि तिच्या भावाला वाचविण्यासाठी आर्त टाहो फोडत होती.
समीरच्या आईने सोनीला दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावेळी सोनी म्हणाली, मला खूप टेंशन आलं आहे. मी माझ्या मुलाला मारून टाकले आहे. मुलीला सुद्धा मारून टाकून मी मरणार आहे. समीरच्या आईने सोनीला खून विनंती केली तेव्हा तीने दरवाजा उघडला. तेवढ्यात धनश्री बाथरुमधून बाहेर पळत आली. समीरच्या आईने तिचा हात पकडून बाहेर ओढत असताना, सोनीने तेवढ्यात धनश्रीच्या गळ्यावर वार केला. सुदैवाने धनश्री सोनीच्या हातून बचावली. तिने बाहेर पडताच माझ्या मामाला फोन करा...माझ्या दादाला वाचवा अशी आर्त हाक देऊन टाहो फोडला.
यावेळी धनश्रीने सांगितले, पप्पा रोज दारु पिऊन घरी येतात. आई सोबत भांडण करतात. त्यांच्या रोजच्या भांडणाला कंटाळून आपण सगळे मरून जाऊ अशी आई म्हणाली. सोनीचा नवरा संतोष हा मजूरी करतो. सकाळीच तो कामासाठी घराबाहेर पडला होता. त्यानंतर सोनीने हा प्रकार केला.