पुणे: पुणे शहर आणि परिसरात हवामानातील बदलांमुळे ताप, थंडी, खोकला आणि सर्दीसारख्या साथीच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घरोघरी आजाराचे रुग्ण दिसून येत असून, खासगी तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ओपीडीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
दूषित पाणी, वातावरणातील आर्द्रता आणि वाढत्या प्रदूषणामुळे विषाणुजन्य आजार वेगाने पसरत आहेत. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत आहे. दैनंदिन कामकाजावर परिणाम होणे आणि औषधोपचाराचा आर्थिक भार, यामुळे नागरिक हैराणझाले आहेत.
वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे अलर्ट मोडवर आला आहे. पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये तपासणी व औषध वाटप सुरू करण्यात आले आहे. डेंग्यू व चिकुनगुनियाचा धोका टाळण्यासाठी ठिकठिकाणी औषध आणि धूर फवारणी तीव्र केली जात आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणे आणि स्वच्छता राखण्यावर भर दिला जात आहे.
नागरिकांना लक्षणे दिसताच स्व-औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, उकळून थंड केलेले पाणी प्यावे आणि परिसरात पाणी साचू देऊ नये.
ताप किंवा खोकला तीव्र असल्यास त्वरित जवळच्या पालिका दवाखान्यात संपर्क साधावा. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा प्रकारची जनजागृतीही केली जात आहे.
धोक्याची चिन्हे
तीव्र ताप, थंडी वाजून येणे किंवा अंगदुखी.
सांधेदुखी, डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या पाठीमागे दुखणे.
अंगावर लालसर पुरळ येणे.
सतत उलट्या किंवा जुलाब होणे.
आजारपणाची कोणतीही लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय करीत बसू नका. त्वरित जवळच्या मनपा दवाखान्यात जा किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मनपा दवाखान्यांमध्ये मोफत आणि योग्य वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध आहेत.- डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका