Peas And Carrot Pudhari
पुणे

Pune Vegetable Market Price: परराज्यातील गाजर, मटारचा हंगाम अंतिम टप्प्यात

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये गाजर, मटार व हिरवी मिरचीचे भाव वाढले; टोमॅटोचे भाव १०% घसरले; पालेभाज्यांमध्ये मेथीच्या भावात घट, पालक आणि पुदिन्याचे दर वाढले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: परराज्यातील गाजर आणि मटारचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात या भाज्यांची आवक घटली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने त्यांच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिरवी आणि ढोबळी मिरचीच्या दरातही रविवारी वाढ नोंदली गेली.

उत्पादनात वाढ होऊन आवक वाढल्याने टोमॅटोच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित भाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी (दि. 15) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती.परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, राजस्थान येथून गाजर सुमारे 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो.

कर्नाटक आणि गुजरात येथून भुईमूग प्रत्येकी 1 टेम्पो मध्य प्रदेश, राजस्थान येथून मटार 8 ते 9 टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 30 ते 35 टेम्पो आवक झाली. तर, स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 450 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, गवार 2 ते 3 टेम्पो, टोमॅटो 10 ते 12 हजार क्रेटस, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 2 टेम्पो, कांदा 110 टेम्पो इतकी आवक झाली.

पालेभाज्यांची आवक वाढली

मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे मेथीच्या मार्केट यार्डातील घाऊक बाजारात जुडीमागे 7 रुपयांची घट झाली आहे. तर, आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे पुदीना आणि पालकच्या भावात जुडीमागे प्रत्येकी 5 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 15) 1 लाख 10 हजार जुडी कोथिंबिरीची आवक झाली. ही मागील आठवड्याच्या तुलनेत जास्त आहे. मागील रविवारी 90 हजार जुडी आवक झाली होती. तर मेथीची आवक मागील आठवड्यात 60 हजार झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन आज 80 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला दर्जानुसार 10 ते 20 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी या वेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT