शंकर कवडे
पुणे: अवकाळी पावसामुळे पुणे विभागात अनेक ठिकाणी काढणी रखडल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात फळभाज्यांची आवक घटली आहे. रविवारी मार्केट यार्डात राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्या दाखल झाल्या. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक सुमारे दहा ट्रकांनी कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारात दाखल होत झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी खूपच कमी असल्याने घेवड्याच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घसरण झाली. तर, उर्वरित अन्य सर्व फळभाज्यांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश येथून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, कर्नाटक आणि गुजरात प्रत्येकी 1 टेम्पो भुईमूग शेंग, इंदौर येथून गाजर 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी 5 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार 7 ते 8 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो, इंदौर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा 40 टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 450 ते 500 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 8 हजार क्रेटस, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, काकडी 7 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 12 टेम्पो, घेवडा, पावटा प्रत्येकी 2 ते 3 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, भुईमुंग शेंग 150 गोणी, कांदा सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाली.
कोथिंबिर, अंबाडी, राजगिरा स्वस्त; तर शेपू, कांदापात महागले
तरकारी विभागात मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक वाढली आहे. त्यामुळे कोथिंबिरीच्या भावात मार्केट यार्डातील घाऊक बाजारात जुडीमागे 5 रुपयांनी घट झाली. तर अंबाडी आणि राजगिराच्या भावात प्रत्येकी 2 रुपयांनी घट झाली आहे. तर आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे शेपूच्या भावात 5 रुपये, तर कांदापातच्या भावात 3 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे पालेभाज्यांची आवक मागील आठवड्यात घटली आहे. मात्र, मध्य प्रदेशसह परजिल्ह्यातून कोथिंबिरीची आवक वाढली आहे. मागील आठवड्यात 80 हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज दीड ते 2 लाख जुडी आवक झाली. त्यामुळे कोथिंबिरीच्या भावात घट झाली आहे. जुडीस घाऊक बाजारात दर्जानुसार 15 ते 25 रुपये भाव मिळत आहे. मागील आठवड्यात 35 हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज 40 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली.