शंकर कवडे
पुणे: शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाल्याने उपवासासाठी लागणाऱ्या बटाटा, हिरवी मिरची, रताळी, भुईमूग आणि भेंडीला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने भेंडी, मिरची, काकडी, शेवगा आणि मटारच्या दरात गत आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित फळभाज्यांची आवक-जावक सुरळीत असल्याने त्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डात राज्यासह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची ५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी २ टेम्पो, हिमाचल प्रदेश व कर्नाटकातून घेवडा २ टेम्पो, इंदूर येथून गाजर ५ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून शेवगा २ टेम्पो, तामिळनाडू येथुन तोतापुरी १०० क्रेट मध्ये प्रदेश येथून लसणाची सुमारे १० टेम्पो, इंदूर, आग्रा येथून बटाटा ६० टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० गोणी, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो ८ हजार क्रेट्स, हिरवी मिरची ७ टेम्पो, काकडी ७ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, गाजर ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, मटार २०० गोणी, घेवडा आणि पावटा प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, कांदा सुमारे ८० टेम्पो आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव:
कांदा : ३५०-४५०, बटाटा : ८०-२२०, लसूण : १०००- २५००, आले (सातारी) : १६०० - १८००, भेंडी : ३००-५००, गवार : ४००-६००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : ७००-७५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : २५०-३००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : १६०- १८०, पापडी : ५००-६००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : ६०-१००, वांगी : २००-४००, डिंगरी : ३००-४००, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : ४५०-५००, तोंडली : कळी : ४००-४५०, जाड : २००-२२०, शेवगा : ६००-७००, गाजर : २५०-३००, वालवर : ५००-६००, बीट : २००-२४०, घेवडा : ५००-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ५५०-८००, मटार : १०००-१३००, पावटा : ४००-५००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १०००, रताळी - २५०-३००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्या कडाडल्या
पाण्याच्या तुटवड्यासह उन्हाचा चटका वाढल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन बाजारातील आवक घटली आहे. रविवारी बाजारात कोथिंबिरीच्या दीड लाख, तर मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने बहुतांश पालेभाज्यांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत गड्डीमागे दोन ते पाच रुपयांनी वधारले आहेत. नवरात्रोत्सवातील उपवासामुळे राजगिऱ्याच्या भाजीला मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात गड्डीचे दर २० ते २५ रुपयांवर पोहोचले आहेत. पालेभाज्यांचे शेकडयातील भाव : कोथिंबीर : १५००-१८००, मेथी : २०००-२५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : १०००-१५००, करडई : १०००-१२००, पुदिना : ५००-६००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : २०००-२५००, राजगिरा : ८००-१०००, चुका : ८००-१०००, चवळई : ८००-१२००, पालक : ८००-१२००.