Vegetable Pudhari
पुणे

Pune Vegetable Market Prices: पुणे मार्केट यार्डात भाजीपाल्याच्या दरात 10% वाढ

पाणीटंचाईमुळे आवक घटली; मागणी जास्त असल्याने पालेभाज्याही महाग

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: उन्हाचा तडाखा वाढल्याने पुणे विभागातील काही भागांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर होत असून, रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक रोडावल्याचे चित्र दिसून आले.

रविवारी बाजारात सुमारे 85 ते 90 ट्रक मधून शेतमालाची आवक झाली. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहिल्याने सर्वच फळभाज्यांच्या भावात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आडतदार निखिल भुजबळ यांनी दिली.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 2 ते 3 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, राजस्थान येथून गाजर सुमारे 2 ते 4 टेम्पो, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून मटार 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून भुईमुग प्रत्येकी 2 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 8 ते 10 टेम्पो तर इंदौर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 25 ते 30 टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 260 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेटस, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10, कोबी 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, घेवडा 2 ते 3 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, कांदा सुमारे 120 टेम्पो इतकी आवक झाली.

आवक घटल्याने पालेभाज्या महागल्या

पाणीटंचाईमुळे फळभाज्यांप्रमाणेच पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. येथील घाऊक बाजारात रविवारी (दि.8) कोथिंबीर सुमारे 1 लाख 50 हजार जुडी, तर मेथीची 60 हजार जुडी आणि हरभऱ्याची 4 ते 5 हजार जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी आहे. कोथिंबिरीला घाऊक बाजारात दर्जानुसार 6 ते 15 रुपये भाव मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT