Green Peas Pudhari
पुणे

Pune Vegetable Market Rates: पुण्यात मटार महाग; टोमॅटो-पावट्याच्या दरात वाढ

मागणी वाढल्याने दर तेजीत; पालेभाज्यांची आवक घटल्याने भाव चढे

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: राज्यातील मटारचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, हिमाचल प्रदेशातील मटारची आवक सुरू झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने मटारचे दर सुमारे दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, कमी भावामुळे शेतकऱ्यांनी तोड कमी केल्याने टोमॅटोची आवक घटल्याचे दिसून आले. कर्नाटकातील पावट्याचा हंगाम संपल्याने स्थानिक पावट्याकडे खरेदीदारांनी आपला मोर्चा वळविला आहे. परिणामी, टोमॅटो आणि पावट्याच्या दरातही वाढ झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित फळभाज्यांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून होते.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात रविवारी (दि. 12) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, राजस्थान येथून गाजर सुमारे 1 टेम्पो, इंदूर येथून गाजर 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, भुईमूग शेंग कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो, हिमाचल येथून वाटाणा एक टेम्पो, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू येथून मिळून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो; तर इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 50 टेम्पो इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 4 टेम्पो, काकडी 8 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 12 टेम्पो, 3 ते 4 टेम्पो, मटार 125 ते 150 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, घेवडा 3 ते 4 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, कांदा सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाली.

पालेभाज्यांची आवक घटली

उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कोथिंबीर आणि शेपूच्या भावात सर्वाधिक जुडीमागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याखालोखाल मेथीच्या भावात 3 रुपये, पुदिन्याच्या भावात 2 रुपये आणि चाकवतच्या भावात 1 रुपयाने वाढ झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे केवळ चुकाच्या भावात जुडीमागे 2 रुपयांनी घट झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येथील बाजारात

रविवारी (दि. 12) कोथिंबिरीची 90 हजार जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी असून, मागील आठवड्यात सव्वा लाख जुडी आवक झाली होती. तर, मागील आठवड्यात 60 हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज 35 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला 10 ते 20 रुपये भाव मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT