Pune News file photo
पुणे

Pune News: पुणे स्थानकावर वंदे भारतचा डबा कशामुळे घसरला? रेल्वेकडून अपघाताची चौकशी सुरू

पुणे स्थानकात वंदे भारत एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याच्या घटनेची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pune News

पुणे: पुणे स्थानकात वंदे भारत एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याच्या घटनेची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. या घटनेमुळे बाधित झालेल्या मुंबई-सोलापूर वंदे भारतच्या ६९९ प्रवाशांना डेक्कन क्विनमधून सोलापूरला रवाना करण्यात आले. तर या अपघातामुळे सोमवार आणि मंगळवारी असे दोन दिवस डेक्कन क्वीन दोन्ही दिशेने दीड ते दोन तास उशिराने धावली.

सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली सोमवारी संध्याकाळी पुणे स्थानकात येताना डायमंड क्रॉसिंगवरून घसरली. या घटनेच्या चौकशीसाठी मध्य रेल्वेने बहुविभागीय समिती स्थापन केली आहे. या समितीत सुरक्षा, विद्युत, यांत्रिक, सिग्नल टेलिकॉम व ट्रॅक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही घटना डायमंड क्रॉसिंगशी संबंधित बिघाडामुळे घडल्याची शक्यता आहे. संबंधित क्रॉसिंग पुणे स्थानकाच्या यार्ड पुनर्रचनेत आधीच बदलण्यात येणार होते. तसेच रेल्वे बोर्डाने असे क्रॉसओव्हर हटविण्याबाबत व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले होते. आता या रचना टप्प्याटप्प्याने हटवून अधिक सुरक्षित ट्रॅक डिझाइन बसवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दुरुस्तीचे काम पूर्ण

घटनास्थळी दुरुस्तीचे काम काही तासांत पूर्ण करण्यात आले असून रेल्वे वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली आहे. देशातील महत्त्वाच्या वेगवान वंदे भारत एक्स्प्रेसशी संबंधित ही घटना असल्याने तिचे गांभीर्य घेऊन अहवालानुसार भविष्यातील ट्रॅक डिझाइन आणि सुरक्षा सुधारणा ठरवण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT