पुणे : सावित्रीबाई फुले पुणे चौकातील उड्डाणपूल गुरुवारपासून (दि. 21) सुरू झाल्यामुळे आता येथील वाहतूक कोंडीचा ताण कमी झाला आहे. याशिवाय औंधकडून गणेशखिंड रोडने शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक कोंडीदेखील कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर गुरुवारपासून या उड्डाणपुलाची औंध ते शिवाजीनगरकडील बाजू सुरू करण्यात आली. औंध रस्त्यावरून राजभवनसमोरून या उड्डाणपुलाला सुरुवात होते, अन् गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रज्ञानसमोर हा पूल उतरतो. या भागातील वाहतुकीचा ताण आता कमी झाल्याचे गुरुवारी दिसले.
पूर्वी विद्यापीठ चौकातील या पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी औंधकडून येणारी वाहतूक चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याकडून विद्यापीठातून पुन्हा बाहेर वळवली होती. उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे आता विद्यापीठात जाणारे गेट बंद केले आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याकडून विद्यापीठात जायची गरज राहिलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध - शिवाजीनगर) वाहतुकीसाठी गुरुवारी खुली करण्यात आली. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.
एकूण 1.7 कि.मी. लांबी
औंध ते शिवाजीनगर 1.30 कि.मी. लांबी
3 लेन रोड
9.5 मीटर रुंदी
दोन खांबामधील अंतर 28 मीटर
प्रकल्पाची किंमत - 277 कोटी रुपये
औंध ते शिवाजीनगर दरम्यानची डबलडेकर उड्डाणपुलाची एक बाजू खुली झाल्यामुळे एका बाजूचा वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. या पुलाबरोबर विद्यापीठ चौकातील सिग्नल सुरू केला आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. या मार्गावरील वाहतुकीचा वेगही वाढेल. हा पूल सुरू झाल्यामुळे औंध रस्त्याच्या पर्यायी रस्त्याचा वापर करणारे वाहनचालक पुन्हा या रस्त्यावर येतील. लवकरच या उड्डाणपुलाच्या पाषाण, बाणेरकडील बाजू सुरू झाल्यावर आणखी येथील वाहतुकीचा वेग वाढेल.- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पुणे