Bullet Train Pudhari
पुणे

Pune Transport Infrastructure Budget: पुण्याच्या दळणवळण प्रकल्पांना निधीचा ‘बुस्टर डोस’ गरजेचा

एक्सप्रेसवे कोंडी, बुलेट ट्रेन, मेट्रो आणि रेल्वे सुरक्षेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतुदीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासह बुलेट ट्रेनच्या पूर्तता आणि पुण्याच्या दळणवळण व्यवस्थेला वेग मिळण्यासाठी निधीच्या ‌‘बुस्टर डोस‌’ची गरज आहे. त्याअनुषंगाने पुण्यासाठी केंद्र सरकारने आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या प्रादेशिक सल्लागार समितीचे सदस्य आनंद सप्तर्षी यांनी केली. तसेच, केंद्रीय अर्थसंकल्पात पुण्याची मेट्रो, बुलेट ट्रेन आणि रेल्वे सुरक्षेसाठी विशेष तरतूद करण्याची मागणीही त्यांनी केली.

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वेगाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारणे योग्यच आहे, मात्र सलग सुट्यांच्या काळात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी हा चिंतेचा विषय बनला आहे. असेही सप्तर्षी यांनी या वेळी सांगितले. सुट्यांच्या काळात अनेक गाड्या येथील घाटात बंद पडतात आणि तासनतास ट्रॅफिक जाम होतो. अनेकदा अपघात होतात. या वेळी प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत असल्याने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे, या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीत तरतूद व्हावी, अशी मागणी सप्तर्षी यांनी केली.

स्लीपर वंदे भारत अन्‌‍ प्रवाशांची सुरक्षा

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी स्लीपर वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवावी, पुण्यालाही स्लीपर वंदे भारत उपलब्ध करून द्याव्यात; जेणेकरून लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, प्रवासाच्या वेगासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे, त्यासाठी आर्थिक तरतुदीची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, सध्या रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) संख्या कमी असल्याने रेल्वेतील गुन्हेगारी वाढत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने सुरक्षा बल वाढविणे गरजेचे आहे. तसेच, नवीन गाड्या सुरू झाल्या तर युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील. त्यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवावी, अशी आग््राही मागणीही सप्तर्षी यांनी केली. पुण्यात बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकर साकार व्हावे आणि रेल्वे सुरक्षा अधिक भक्कम व्हावी, यासाठी अर्थसंकल्पात पुण्यासाठी विशेष पॅकेज मिळावे, अशी अपेक्षा मध्य रेल्वेच्या प्रादेशिक सल्लागार समितीचे सदस्य आनंद सप्तर्षी यांनी व्यक्त केली.

पुणे स्टेशनच्या कायापालटासाठी हवी भरीव तरतूद

पुणे रेल्वे स्थानकाचा विकास करताना फक्त आजचा विचार नको, तर आगामी 50 वर्षांतील बुलेट ट्रेन आणि हायपर लूपसारख्या तंत्रज्ञानाचा विचार करून भव्य डीपीआर तयार करावा अन्‌‍ त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद व्हावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग््रुापच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली.

पुणे स्थानकावर वाढती गर्दी आणि अपुऱ्या सुविधा लक्षात घेता हर्षा शहा यांनी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या. स्थानकाचे प्लॅटफॉर्म मोठे करून प्रवाशांना फिरण्यासाठी मोकळी जागा द्यावी. तसेच, सर्व सोयींनी युक्त अशी निःशुल्क प्रशस्त प्रतिक्षालये उपलब्ध करून द्यावीत तसेच जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. येत्या काळात बुलेट ट्रेन, हायपर लूप आणि सायबर ट्रेन पुण्यात येतील. 8पान 2 वर

त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासूनच केंद्रीय अर्थ संकल्पामध्ये विशेष आर्थिक तरतूद करावी. सध्या रेल्वे स्थानकाशेजारील मौल्यवान जागा संगम पार्क सारख्या अधिकारी वसाहतींसाठी वापरली जात आहे. भविष्यातील विस्तारीकरणासाठी संगम पार्क आणि मालधक्का या जागांचा समावेश करून एकच भव्य प्रकल्प आराखडा तयार करावा, अन याचकरिता प्रत्यक्ष अर्थसंकल्पात पुण्यासाठी भरीव निधीची तरतूद करून कामाला तातडीने सुरुवात करावी.

पारदर्शकतेची मागणी

पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आराखडा (डीपीआर) हा कागदावर राहू नये. तो आराखडा जनतेसाठी खुला करावा, जेणेकरून पुणेकरांना त्यांच्या शहरात कोणत्या दर्जाचे रेल्वे स्थानक उभे राहणार आहे, याची स्पष्ट कल्पना येईल. तसेच, काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील घ्यावे. या रेल्वे स्थानकाच्या या मेकओव्हरकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे येथील कामकाज आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार व्हावे, त्यासाठी केंद्राने भरीव निधी द्यावा, अशीही मागणी हर्षा शहा यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT