पुणे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त शनिवारी दि. १ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील जेधे चौक ते सारसबाग परिसरात विविध सामाजिक मंडळे आणि राजकीय पक्षांकडून मिरवणूक आणि पुष्पहार अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने दुपारी २ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार विशेष वाहतूक बदल लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता खालीलप्रमाणे रस्ते बंद राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
बंद मार्ग: जेधे चौकातून सारसबागकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग: सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी जेधे चौक-सातारा रस्ता-ढोले चौक-मित्रमंडळ चौक-सावरकर चौकमार्गे सिंहगड रस्त्याकडे जावे. सिंहगड रस्त्याकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी दांडेकर पूल-नाथ पै चौक-ना. सी. फडके चौक-पुरम चौक-टिळक रस्ता-जेधे चौक या मार्गाचा वापर करावा.
जेधे चौकातील वाय जंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील. कात्रजकडून सारसबागकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी श्रीजी जंक्शन न जाता लक्ष्मीनारायण (ढोले चौक) येथून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
वेगा सेंटर ते सारसबाग यादरम्यान ग्रेडसेपरेटरमधून वाहनांना प्रवेश बंद राहील. वेगा सेंटर-पर्वती पंप-उद्यान-राष्ट्रभूषण चौकमार्गे इच्छित स्थळी जावे. सावरकर चौकापासून पुढे पुरम चौकापर्यंत वाहतूक बंद राहील.
सावरकर चौक-दांडेकर पूल-नाथ पै चौक-ना. सी. फडके चौक-कल्पना हॉटेल-डावीकडे टिळक रस्ता-पुरम चौकमार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
दांडेकर पूल/सिंहगड जंक्शन येथून सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील. सावरकर चौक-दांडेकर पूल-नाथ पै चौक- ना. सी. फडके चौक-कल्पना हॉटेल-डावीकडे टिळक रस्ता-पुरम चौक मार्ग खुला राहील.
वाहतुकीत शिथिलता
पुरम चौक ते जेधे चौक या मार्गावरील प्रवेश वाहतुकीच्या परिस्थितीनुसार शिथिल करण्यात येईल. दांडेकर पूल ते सावरकर चौक या मार्गावरील वाहतूक दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार शिथिल करण्यात येईल. नीलायम ब्रिजने सावरकर चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार नीलायम ब्रिजजवळील गावठाणमार्गे वळविण्यात येईल. शिवाजी रोडवरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. सेव्हन लव्हज चौकातून जेधे चौकाकडे जाणारी वाहतूकही आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल.
पार्किंग व्यवस्था
सातारा रस्त्याकडून मित्रमंडळ चौकमार्गे सावरकर चौकाकडे येणाऱ्या अनुयायांनी आपली दुचाकी वाहने पाटील प्लाझा येथे पार्क करावीत, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन वेळोवेळी बदल करण्यात येऊ शकतात. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उप आयुक्त (वाहतूक) कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
पीएमपी बसमार्गात बदल
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी सारसबाग चौकातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता, पीएमपीने दुपारी काही बस मार्गांमध्ये बदल केले आहेत. सारसबाग आणि जेधे चौक येथील रस्ता बंद झाल्यास, संबंधित मार्गांवरील बस लक्ष्मी नारायण टॉकीजकडून डाव्या बाजूने वळवून मित्रमंडळ चौकमार्गे चालवल्या जातील. या बदलांचा परिणाम बस मार्ग क्र. २, २अ, २ब, ३, ४, ११, १३, १५, २१, २६, ४१, ४२, ५०, ६४, ७०, ९७, १०१, १११, ११७, २१६, २२६, २९७, ३३९, ३५४ यासह इतर प्रमुख मार्गांवर होईल. तसेच, स्वारगेट येथील नटराज बसस्थानकाचा रस्ता बंद झाल्यास तेथून सुटणाऱ्या बस खंडोबा मंदिर (पर्वती पायथा) येथून सोडण्यात येतील. रस्ता पूर्ववत सुरू झाल्यानंतर वाहतूक नियमित होईल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.