Sasoon Hospital Pudhari
पुणे

Toxic Liquor Deaths: पुण्यात विषारी दारूचे चार बळी; ससूनमध्ये उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू

मिथेनॉल मिश्रित दारूचा संशय; रासायनिक विश्लेषण अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ससून रुग्णालयात पांढरेमळा येथील एक आणि ससाणेनगर परिसरातील दोन, अशा तीन जणांना गुरुवारी रात्री विषारी दारूमुळे त्रास झाल्याने उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच अवघ्या दोन ते तीन तासांत तिघांचाही मृत्यू झाला.

याशिवाय दापोडी परिसरातील एका व्यक्तीचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व मृतदेहांची शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. रासायनिक विश्लेषण अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.

गावठी दारूमध्ये ‌‘किक‌’ वाढविण्यासाठी वापरलेल्या स्पिरिट आणि मिथेनॉलच्या अतिप्रमाणातील सेवनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता ससून रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांमध्ये उलट्या, जुलाब, मळमळ आणि दृष्टी धूसर होणे, अशी लक्षणे आढळून आली होती.

मृतांच्या अवयवांचे रासायनिक विश्लेषण केल्यानंतरच मृत्यूमागील खरे कारण समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मृतांच्या महत्त्वाच्या अवयवांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात येणार आहेत.

चार जणांना अत्यंत गंभीर अवस्थेत ससून रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात दाखल केले होते. त्यांना तीव गॅस्ट्रोएन्टेरायटीस, शुद्ध हरपणे आणि मेटाबॉलिक ॲसिडोसिस अशी लक्षणे होती. यातील एक रुग्ण रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृतावस्थेत होता, तर उर्वरित तिघांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. आम्ही शक्य ते सर्व उपचार केले; मात्र दुर्दैवाने त्यांना वाचवता आले नाही आणि तीन ते चार तासांच्या आत चौघांचाही मृत्यू झाला. आमच्याकडे नियमितपणे मद्यपानाचे व्यसन असलेले तसेच लिव्हर सिरॉसिसचे रुग्ण उपचारांसाठी येत असतात.
डॉ. यल्लप्पा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT