Arrested Pudhari
पुणे

Pune Toxic Liquor Case: विषारी दारू मृत्युकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे जेरबंद; उरुळी कांचनमध्ये फिल्मी स्टाईल पाठलाग

फरारी काळात बदलला लूक; दाढी-मिशा काढून मळकट कपड्यांत वावरत पोलिसांना देत होता गुंगारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारू मृत्युकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढेलाग उरुळी कांचन पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. उरुळी कांचन भागात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी बाळू लोंढेने फरार काळात आपला लूकच बदलला होता. नेहमी दाढी-मिशा वाढवून तसेच कपाळावर टिळा लावून वावरणारा बाळू आता दाढी- मिशा काढून अन् मळकट कपडे घालून वावरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत १० ते १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सध्या ते सर्व आरोपी न्यायालयीन कोठीत आहेत, तर या रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सीआयडीची पथके घेत आहेत. हा प्रकार २६ ते २८ मे या कालावधीत दापोडी तसेच हडपसर परिसरात घडला होता. दारू मृत्युकांडामुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

तपासात आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल फोन आणि इतर तांत्रिक पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. दरम्यान, या दारू मृत्युकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे गुन्ह्यानंतर फरार झाला होता. सीआयडी, तसेच पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो मे महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. उरुळी कांचन पोलिसांना बाळू लोंढे हा लोणी काळभोर तसेच उरुळी कांचन या भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी त्याला पोलिसांना अखेर जेरबंद केले. त्याला पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अन्य आरोपी व संबंधितांचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू

बाळू लोंढे याच्या अटकेमुळे दारू मृत्युकांडाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणात त्याची भूमिका, दारूचा पुरवठा, संबंधित व्यक्ती तसेच मृत्युकांडामागील संपूर्ण साखळी याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील अन्य आरोपी आणि संबंधितांचे धागेदोरे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT