Help desk Pudhari
पुणे

Pune Tourists Stranded Dubai: इराण-इस्रायल संघर्षामुळे दुबईत पुणेकर अडकले; महापालिकेचा विशेष मदत कक्ष

फ्लाइट रद्द झाल्याने महाराष्ट्रातील पर्यटकांची अडचण; पुणे महापालिकेकडून हेल्पलाईन सुरू करण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे, मुंबई, कोल्हापूर, कोकणातील अनेक पर्यटक दुबईत अडकून पडले आहेत. अनेक विमानसेवा रद्द झाल्याने त्यांना पुन्हा भारतात येण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमिरात विमान कंपनीच्या दुबईच्या कार्यालयात अनेक भारतीयांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेमार्फत पर्यटकांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. 135 जणांना आतापर्यंत संपर्क करण्यात आला आहे. मात्र, राज्य शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याचे दुबईत अडकलेल्या पर्यटकांनी दै. ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

आम्ही दुबई फिरण्यासाठी आलो होतो. मात्र, सर्व फ्लाइट रद्द झाल्याने आता आम्ही अडकून पडलो आहोत. आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. लवकरच आम्हाला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून मदत मिळेल अशी आशा आहे.
अनिल ढेकणे, पर्यटक
आम्ही दुबई फिरण्यासाठी आठ जण आलो होतो. मात्र, इस्रायल व अमेरिकेने अचानक इराणवर हल्ला केल्याने इराणकडून ड्रोन व मिसाईल हल्ले सुरू करण्यात आले आहे. येथील हवाई संरक्षण प्रणालीमार्फत हे हल्ले रोखले जात आहेत. आम्ही अशा वातावरणातही येथे फिरलो. मात्र, आता पुन्हा परत यायचे आहे. पण, सर्व फ्लाइट रद्द झाल्या आहेत. आम्हाला मुंबईतून मंत्रालयातून मदतीसाठी फोन आलेला. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळाली नाही. फ्लाइट कधी सुरू होतील माहिती नाही. त्यामुळे सरकारने तातडीने आम्हाला मदत करावी.
प्रकाश लटके, पर्यटक

इराण- इस्रायलमधील तीव होत चाललेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे विद्यार्थी, पर्यटक, व्यावसायिक तसेच नोकरीनिमित्त गेलेले अनेक पुणेकर तिथे अडकले आहेत. या धोकादायक परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने तातडीने ‌‘विशेष मदत कक्ष‌’ तयार केला आहे.

पुणे महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्तांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेत परदेशात अडकलेल्या पुण्यातील नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी ‌‘स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष‌’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या कक्षामार्फत परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबतची माहिती संकलित केली जाणार असून, त्यासाठी लवकरच अधिकृत हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला जाणार आहे. युद्धग््रास्त भागात अडकलेल्या पुणेकरांची अधिकृत माहिती घेण्याचे कामही महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यात अडकलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव, परदेशातील सध्याचा पत्ता किंवा हॉटेलचा पत्ता, पासपोर्ट क्रमांक आणि स्थानिक संपर्क क्रमांक यासारखी अत्यावश्यक माहिती संकलित केली जात आहे. संबंधित नातेवाईकांनी

ही माहिती तातडीने महापालिकेकडे सादर करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संकलित करण्यात येणारी ही माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडे तत्काळ पाठविण्यात येणार आहे. या समन्वयातून परदेशात अडकलेल्या पुणेकरांच्या सुटकेसाठी आणि त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT