रक्त संकलनात पुणे राज्यात अव्वल Pudhari File Photo
पुणे

World Blood Donor Day: रक्त संकलनात पुणे राज्यात अव्वल

मागणीच्या तुलनेत आणखी दात्यांची गरज

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रक्त संकलनात पुणे राज्यात आघाडीवर आहे. राज्यात जानेवारी ते मे या कालावधीत पुणे जिल्ह्यात 1 लाख 58 हजार 289 रक्तपिशव्यांचे संकलन झाले. यासाठी 2127 रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. रक्त संकलनात पुण्यानंतर रायगड आणि मुंबईमध्ये सर्वाधिक रक्तसंकलन झाले आहे. सर्वात कमी रक्तसंकलन चंद्रपूर आणि हिंगोलीतून झाले आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आकडेवारीनुसार, राज्यात यावर्षी जानेवारी ते मे या कालावधीत 17 हजार 139 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून 9 लाख 48 हजार 168 रक्त पिशव्यांचे संकलन झाले. (Latest Pune News)

राज्यात 9 लाख 45 हजार 21 रक्त पिशव्यांचे संकलन ऐच्छिक रक्तदानातून झाले आहे. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

रक्त संकलनात अव्वल, तरीही तुटवडा

गेल्या चार वर्षांमध्ये राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रक्तसंकलन झाले आहे. मात्र, विविध आजारांचे वाढते प्रमाण, सुट्ट्यांचा काळ यामुळे पुण्यात दर वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत रक्ताचा तुटवडा निर्माण होतो.

सध्या पुण्यात दररोज सुमारे 1 हजार 500 रक्तपिशव्यांची गरज आहे, पण उपलब्धता फक्त 300 ते 400 पिशव्यांपर्यंत मर्यादित आहे. परिणामी, रुग्णालयांमध्ये रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत, अशी माहिती ’रक्ताचे नाते’ ट्रस्टचे संचालक राम बांगड यांनी दिली.

रक्तदान कोणी करावे?

  • ’जागतिक आरोग्य संघटने’नुसार रक्तदानासाठी 18 ते 65 वय व किमान 50 किलो वजन असणे आवश्यक आहे. प्रत्येक रक्तदानात सुमारे 450 मि. ली. म्हणजेच सुमारे एक युनिट रक्त घेतले जाते.

  • लोकसंख्येच्या किमान 1 टक्के लोकांनी रक्तदान केल्यास देशाच्या मूलभूत रक्त गरजा पूर्ण होतात.

  • सर्दी, ताप, घशात खवखव, संसर्ग इत्यादी असताना रक्तदान करता येत नाही.

  • टॅटू किंवा बॉडी पिअर्सिंग केल्यास सहा महिने रक्तदान करता येत नाही.

  • लहान दंतचिकित्सा प्रक्रियेनंतर 24 तासांनी व मोठ्या प्रक्रियेनंतर एका महिन्याने रक्तदान करता येते.

  • किमान हिमोग्लोबिन स्तर स्त्रियांसाठी 12.0 ग्रॅमेसिलीटर व पुरुषांसाठी 13.0 ग्रॅमेसिलीटर असणे आवश्यक आहे.

संक्रमण परिषदेअंतर्गत राज्यामध्ये 250 परवानाधारक व नोंदणीकृत रक्तपेढ्या कार्यरत आहेत. रक्त संकलन, रक्ताची तपासणी व त्याचे वितरण परवानाधारक रक्तपेढ्यांमार्फत केले जाते. पुण्यात यापैकी 31 मोठ्या रक्तपेढ्या आहेत व 41 रक्तपेढ्या जिल्हा पातळीवर आहेत. रक्तपेढ्याचे वर्गीकरण रक्त संकलनाच्या आधारे करण्यात येते. नागरिकांनी आपणहून रक्तदानासाठी पुढाकार घेतल्यास अनेकांचे जीव वाचवता येतील.
- डॉ. पुरुषोत्तम पुरी, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT