धायरी: ‘पोलिस भरतीत निवड झालेल्या वीस हजार उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरू असून, लवकरच त्यापैकी किमान एक हजार उमेदवारांचा पुणे पोलिस दलात समावेश केला जाईल,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सिंहगड रस्ता परिसरातील सिंहगड रोड पोलिस ठाण्यातंर्गत विठ्ठलवाडी येथील आनंदनगर पोलिस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून या पोलिस चौकीची इमारत उभारण्यात आली आहे. (Latest Pune News)
माधुरी मिसाळ म्हणाल्या की, राजाराम पूल परिसरात पुणे शहर पोलिसांची हद्द संपत होती. त्यामुळे या भागातील नागरिकांना ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील हवेली पोलिस ठाण्यामध्ये जावे लागत होते. त्यामुळे शहर पोलिसांची हद्द वाढवण्यात आली आहे. आता आंनदनगर येथे पोलिस चौकीचे लोकार्पण झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे .
आमदार भीमराव तापकीर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी, अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलिप दाइंगडे, बाबाशेठ मिसाळ आदी उपस्थित होते.