पुणे: टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर दुसऱ्या दिवशी 'दैनिक पुढारी'च्या वतीने घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान ज्या व्यावसायिकांची दुकाने आणि स्थानिक नागरिकांची घरे आगीत भस्मसात झाली, ते सर्व जण राखेच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले अर्धवट जळालेले साहित्य व लोखंड वेचताना दिसून आले. अनेक वर्षांच्या कष्टातून, घाम गाळून उभा केलेला संसार एका रात्रीत खाक झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते, काहींचा तर अक्षरशः कंठ दाटून आला होता.
जळालेल्या अवशेषांमधून हाती लागेल ते साहित्य बाजूला करताना व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हतबलता आणि वेदना स्पष्टपणे जाणवत होत्या. पोटापाण्याचा आधार हिरावला गेल्याने पुढील उदरनिर्वाह कसा चालवायचा, हा प्रश्न त्यांना सतावत असल्याचे चित्र गुरुवारी (दि.१९) पाहायला मिळाले.
या वेळी बाधित व्यावसायिक व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता, त्यांनी या आगीच्या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नेते, अधिकारी मंडळी फक्त येतात, पाहणी करतात आणि आश्वासने देऊन निघून जातात. पण, प्रत्यक्षात आम्हाला कोणीही मदत केली नाही. साधी पाण्याची बाटली किंवा चहासुद्धा कोणी विचारला नाही, अशी खंत त्यांनी या वेळी 'पुढारी'च्या प्रतिनिधीकडे बोलून दाखवली.
एकंदरीत, टिंबर मार्केटमधील या आगीने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान केले असून, प्रशासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी आर्त हाक बाधित व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
वर्षांची मेहनत एका रात्रीत जळून खाक झाली. हाती काहीच राहिलेले नाही. किमान प्रशासनाने तातडीची मदत देऊन आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी आधार द्यावा.शोएब लांडगे, व्यावसायिक
आग नियंत्रणात आल्यानंतरही आमच्या वेदना संपलेल्या नाहीत. नेते, अधिकारी फक्त आश्वासने देऊन गेले. पण कोणीही विचारपूस केली नाही. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी.अब्दुल रहमान अल्लाबक्ष शाबई, व्यावसायिक