महेंद्र कांबळे
पुणे: भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये बुधवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने शहरातील दाट लोकवस्ती आणि व्यावसायिक पेठांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. २०२३ मध्ये टिंबर मार्केटमध्ये लागलेली आग ही धडा होती. परंतु त्यातून कोणत्याही प्रकारचा धडा घेतला गेला नसल्याचे बुधवारच्या आगीने स्पष्ट झाले आहे. २०२३ सालच्या टिंबर मार्केट येथील आगीच्या घटनेनंतर अग्निसुरक्षेचे ऑडिट करण्याच्या, पाण्याच्या टाक्या उभारण्याच्या, स्प्रिंकलर यंत्रणा बसवण्याच्या सूचना अग्निशनम दलाकडून दिल्या गेल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात या उपाययोजनांची अंमलबजावणी आणि नियमित तपासणी झाली का, हा प्रश्न टिंबर मार्केटमधील आगीने उपस्थित केला आहे.
टिंबर मार्केटमध्ये यापूर्वी आगीची घटना घडल्यानंतर संबंधितांना अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या सूचनांवर कितपत कार्यवाही झाली, याची माहिती समोर आलेली नाही. अग्निसुरक्षा ऑडिट करणे, पाण्याच्या टाक्या बसवणे, स्वयंचलित स्प्रिंकलर यंत्रणा उभारणे, तसेच आग विझविण्यासाठी आवश्यक हायड्रंट पॉइंट उपलब्ध करून देणे या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. मात्र, जागेची कमतरता, पत्र्याच्या शेडची बांधकाम रचना आणि अरुंद रस्ते यामुळे प्रत्यक्षात यंत्रणा उभारण्यात अडचणी येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचे नुकताच लागलेल्या आगीमुळे समोर आले आहे. टिंबर मार्केटमधील अनेक दुकाने पत्र्याच्या शेडमध्ये आहेत. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे कठीण जाते. केवळ अग्निशमन उपकरणे बसवून जबाबदारी संपत नाही, तर त्यांची नियमित तपासणी आणि देखभाल करणेही गरजेचे आहे. याबाबत व्यापारी, नागरिक आणि त्याच बरोबर अग्निशमन दलाचीही जबाबदारी महत्त्वाची आहे.
हायड्रंट पॉइंटची नोंद; प्रत्यक्ष तपासणीचे काय?
शहरात अग्निशमनसाठी हायड्रंट लाईन आणि पाणीपुरवठ्याचे पॉइंट उपलब्ध आहेत. त्यांची नोंदही संबंधित यंत्रणेकडे आहे. मात्र, प्रत्यक्ष घटनास्थळी गरज भासल्यास हे पॉइंट कार्यरत आहेत का, त्यातून पुरेशा दाबाने पाणी मिळते का, याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत संयुक्त सर्वेक्षण करून हायड्रंट पॉइंटची पाहणी केली जात होती. मात्र, कालांतराने या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. मागील कित्येक वर्षापासून त्याची तपासणीच होत नाही.
होळीच्या अगोदरच्या दिवशी मॉकड्रिल; वर्षभर तयारीचे काय?
होळीसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून मॉकड्रिल घेतले जाते. होळीच्या आदल्या दिवशीही संभाव्य आगीच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी सराव केला जातो. मात्र, अशा सरावामध्ये घटनास्थळी पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, पाण्याची उपलब्धता किती आहे आणि प्रत्यक्ष आग विझविण्याची यंत्रणा किती सक्षम आहे, याचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. मोठ्या व्यावसायिक आस्थापनांमध्येही नियमित मॉकड्रिल घेणे गरजेचे आहे.
अग्निशमन उपकरणे बसवण्याबरोबर देखभालही महत्त्वाची
अनेक कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये अग्निशमन उपकरणे म्हणजेच फायर एक्स्टिंग्विशर बसवलेले असतात. मात्र, त्यातील अग्निरोधक द्रव्याची मुदत संपल्यानंतर ते रिफिल करणे आवश्यक असते. उपकरणे केवळ दर्शनी भागात लावून उपयोग नाही. त्यांची नियमित तपासणी, मुदत आणि कार्यक्षमता तपासणे गरजेचे आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्यास विमा संरक्षण मिळण्यातही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था याकडे व्यावसायिकांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाची कसरत
मुख्य अग्निशमन केंद्र असलेल्या लोहियानगर परिसरातील अरुंद रस्ते, अनियंत्रित वाहने आणि दिवसा होणारी वाहतूक कोंडी यामुळे अग्निशमन वाहने गर्दीतून काढून घटनास्थळी पोहोचवणे मोठे आव्हान ठरते. आगीची तीव्रता वाढण्यापूर्वी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचता आले नाही, तर नुकसान मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे या परिसरातील वाहतूक नियोजन, अग्निशमन वाहनांसाठी मोकळे मार्ग आणि पाण्याची पर्यायी व्यवस्था यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
नियमित तपासणी गरजेची
टिंबर मार्केटमधील आगीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, आग लागल्यानंतर मदतकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आग लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही आवश्यक आहे. पत्रव्यवहार, ऑडिट आणि सूचनांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी, नियमित तपासणी आणि जबाबदारी निश्चित केल्याशिवाय अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती रोखणे कठीण आहे.