Pune Timber Market Fire Pudhari
पुणे

Pune Timber Market Fire: पुण्यातील टिंबर मार्केट आगीचे कारण गुलदस्त्यात; ४५ दुकाने, सहा घरे खाक

जाणीवपूर्वक आग लावली का? पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत; अग्निशमन विभागाच्या अहवालानंतर कारण स्पष्ट होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात मंगळवारी (दि. १८) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत प्लायवूडच्या दुकानांसह एकूण ४५ दुकाने आणि सहा घरे जळून खाक झाली. एका वाहनाचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात आग आणि जाळपोळीची नोंद केली असून, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. घटनास्थळाची पाहणी, उपलब्ध माहिती आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करून अग्निशमन विभाग आपले मत कळविणार आहे. विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट होण्यास मदत होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या आगीचे कारण निश्चित झालेले नसल्याने विविध शक्यता तपासल्या जात आहेत. जाणीवपूर्वक आग लावण्यात आली का, यासह घटनेच्या सर्व बाजूंची पडताळणी केली जात आहे.

या आगीत व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. दुकानांमधील प्लायवूड, इतर साहित्य आणि माल जळून खाक झाल्याने अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. आगीत जळालेल्या ४५ दुकानांपैकी अद्याप कोणत्याही दुकानदाराने विम्याच्या नुकसान भरपाईसाठी संपर्क साधलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. नुकसानग्रस्त दुकाने आणि घरांचा पोलिसांकडून पंचनामा केला आहे. पंचनाम्यात नुकसानीची नोंद घेण्यात आली असून, तपासासाठी आवश्यक माहिती संकलित केली जात आहे.

आग लागल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने मोठी मोहीम हाती घेतली. पीएमआरडीएच्या एकूण ३१ अग्निशमन वाहनांच्या मदतीने जवानांनी पूर्ण आग नियंत्रणात आणण्यासाठी साडेसात तास अथक प्रयत्न केले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत कूलिंगचे काम सुरू होते. तर, रात्री आग धुमसू नये म्हणून एक वाहन घटनास्थळी तैनात केले होते. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्य असल्याने आग आटोक्यात आणताना अडचणी निर्माण झाल्या. मात्र, जवानांच्या प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेची तीव्रता मोठी असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

व्‍यापारी अन् रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

घटनेनंतर व्यापारी आणि रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुकानांतील माल आणि घरातील संसारोपयोगी वस्तू जळाल्याने बाधित कुटुंबांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग इतर भागांत पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले. जवानांनी समन्वयाने काम करत काही तासांत आग नियंत्रणात आणली. आता पंचनामे आणि विभागाचा अहवाल तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT